कराड | कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कडक लाॅकडाऊन जाहीर केलेले असताना चाफळमधील काही दुकानदार दुकाने सुरू ठेवून मालाची विक्री करीत आहेत. अशा दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोणीही नियम मोडून आपली दुकाने सुरू ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या काळात केवळ औषधांची दुकाने व दवाखाने उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. बेकरी, भाजीपाला, किराणा माल व इतर दुकानेदेखील बंद ठेवण्याचा आदेश काढलेला आहे.
तरीही चाफळमधील काही दुकानदार छुप्या पद्धतीने दुकाने सुरू ठेवून माल विक्री करीत आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे नियम पाळणाऱ्या दुकानदारांवर अन्याय होत आहे, अशा तक्रारी चाफळमधील काही दुकानदारांनी चाफळ पोलिसांकडे केल्या होत्या. पोलिसांनी चाफळ बाजारपेठेत फेरफटका मारला असता चाफळ गावात एक दुकानदार आपले दुकान उघडे ठेवून मालाची विक्री करताना आढळून आला. दुकानमालकावर पोलीस व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली.