कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शहरात कोरोना पाॅझिटीव्ही रेट कमी झाला आहे, मात्र खेड्यात कमी होत नाही. आता शाळा, मंगल कार्यालयात होम आयसोलेशनला गावात बळ मिळत आहे. परंतु तरीही बाधित आयसोलेशनमध्ये येत नाहीत अशा लोकांच्यावर आता शिक्के तयार केले असून पोलिस व आशा वर्कर होम क्वारंटाईनचे शिक्के मारणार असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी सांगितले.
कराड येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी अजयकुमार बन्सल म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस खाते नेहमीच सक्रीय राहिले आहेत. या काळात आम्ही कारवाई केलेल्या आहेत. ब्रेक द चेन 3 एप्रिलपासून सुरू झाला असून आज जवळपास 50 दिवस झाले आहेत. या काळात पोलिसांनी जवळपास सव्वादोन कोटी रूपयांचा दंड वसूल केलेला आहे. लसीकरण केंद्रावर बंदोबस्त, डोअर टू डोअर काम असो किंवा सर्वच ठिकाणी पोलिसांचे काम चांगले आहे.
शहरात ड्रोन आणि पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. ग्रामीण भागावर आता लक्ष ठेवून विलगीकरण कक्ष उभारण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, महसूल आणि वैद्यकीय विभाग यांच्यासोबत पोलिस खातेही काम करत आहे.
दवाखान्यातील पेशंटच्या एका नातेवाईकांला पास
हाॅस्पीटलमध्ये असणाऱ्या पेशंटसाठी भेटण्यासाठी किंवा इतर कामासाठी नातेवाईकांना पास देण्यात येणार आहे. परंतु केवळ एकच पास दिला जाणार असून एकच व्यक्ती त्या पासवर हाॅस्पीटलमध्ये जावू शकते. ज्या व्यक्तीजवळ पास असेल त्याला प्रवास करताना दंड केला जाणार नाही, हाॅस्पीटलमध्ये एन्ट्री दिली जाईल, असेही पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.