सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
आम्ही नव्हे उदयनराजे आंदोलन करत आहेत. आम्ही आमच्या पध्दतीने निषेध केलेला आहे. आमचा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्याचा विश्वास राहिला नसला तर माहीत नाही. राज्यपालांच्या बदलीसाठी महाराष्ट्रात आंदोलन करुन काय उपयोग? जर आंदोलन करायचंच असेल तर दिल्लीत जा, तिथे आंदोलन करा. आंदोलनामागे राजकीय काही स्वार्थ आहे का? यांची माहिती घेतली पाहिजे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला.
सातारा पालिकेच्या घरपट्टी प्रक्रियेला स्थगिती देण्याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सोमवारी सकाळी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन दिले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कोणतीही व्यक्ती असो किंवा राजकीय पक्ष प्रत्येकानेच महापुरुषांचा आदर राखायला हवा.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बदलीसाठी महाराष्ट्रात आंदोलन केले जात आहे; परंतु त्याचा काही एक उपयोग नाही. त्यांच्या बदलीचा निर्णय हा केंद्रातून होतो. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनी दिल्लीत जावे, तिथे आंदोलन करावे. आम्ही आमच्या पद्धतीने योग्य तो निषेध केला आहे. आमच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत नक्कीच योग्य तो निर्णय घेतील, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.