हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे पूजाचे वडील लहू चव्हाण अत्यंत व्यथित झाले आहेत. लेक गमावल्याने लहू चव्हाण यांच्यावर खूप मोठा आघात झाला असून पूजाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चांनी ते अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातूनच आमची बदनामी थांबवली नाही तर मी आत्महत्या करेन, अशी उद्विग्न प्रतिक्रिया लहू चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
पूजाबाबत उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यावर लहू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कृपा करून आमची आणखी बदनामी करू नका. आमचे अर्धे कपडे काढलेच आहात. आता उरलेले कपडे तरी काढू नका. नाहीतर मलाही आत्महत्येचा मार्ग निवडावा लागेल, असा उद्वेग व्यक्त करत पूजाच्या आत्महत्येला वेगळं वळण न देण्याची विनंती त्यांनी केली. माझी लेक खूप चांगली होती. लोक तिला नाहक बदनाम करत आहेत आणि मी हे कुणाच्याही दबावाखाली बोलत नाही, असेही लहू यांनी स्पष्ट केले.
माझी मुलगी खूप चांगली होती. लोकं उगाच तिची बदनामी करत आहेत. राजकारणाच्या दबावाखाली मी बोलत आहे का असंही विचारलं जात आहे. पण माझ्यावर कोणताही दबाव नाही, असं लहू चव्हाण यांनी सांगितलं. मी पुण्याला गेलो होतो. तिथे विचारपूस केली. त्यावेळी पूजा गॅलरीत बसली होती. दीड वाजता ती खाली पडली. चक्कर येत असल्याचं ती सांगत होती, असं तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या मित्राने सांगितलं. सांगा आता मी कुणावर आरोप करू? असा सवाल त्यांनी केला.
पूजाने पोल्ट्री व्यवसायासाठी २५ ते ३० लाखांचे कर्ज घेतले होते. पोल्ट्रीचं बांधकाम करून प्रत्यक्षात व्यवसाय सुरूही झाला होता. मात्र लॉकडाऊन लागल्याने घात झाला. करोना संकटामुळे कोंबड्या फुकट वाटण्याची वेळ आमच्यावर आली. त्यात बर्ड फ्लूमुळे उरल्यासुरल्या आशाही मावळल्या. त्या तणावाखाली ती होती. मी तिला अनेकदा समजावले. माझ्या नावावर २५ लाखांची एलआयसी पॉलिसी आहे. त्यावर कर्ज काढू असं सांगितलं. चार-पाच लाखांचं कर्जही मिळालं. पण पूजा अस्वस्थच होती. त्यातून गावाकडे मन रमत नसल्याने ती पुण्याला गेली होती, अशी माहितीही लहू यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’