म्हसवड प्रतिनिधी | माण-खटाव पोलीस पाटील संघटनेचा आदर्श पत्रकार पुरस्कार आपल्या परखड लेखणीच्या माध्यमातून दुष्काळी माण तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे दै पुढारीचे पत्रकार पोपट बनसोडे यांना जाहीर झाला आहे. माण – खटाव पोलीस पाटील संघटनेचा पहिला वर्धापनदिना निमित्त स्नेहमेळावा 2 मार्च रोजी दहिवडी येथे साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात आदर्श पत्रकार म्हणून पोपट बनसोडे यांची निवड करण्यात आली असून पोपट बनसोडे हे गत 14वर्षी पासून दुष्काळी माण तालुक्यात पत्रकार म्हणून काम करत आहेत. त्यांनी दुष्काळी माण तालुक्याच्या व्यथा परखडपणे मांडून शासन स्तरावर निर्भिडपणे लिखान केले आहे, दुष्काळाच्या झळा या बातम्या विशेष परिणाम कारक होत्या. पोपट बनसोडे हे समाजातील विविध प्रश्नाना त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम करीत आहेत.शिवाय अन्यायाला वाचा फोडण्याचे कामही ते करीत आहेत.ते करीत असलेल्या लिखाणामुळे समाजातील अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
2 मार्च रोजी दहिवडी येथील बालाजी मंगलकार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बनसोडे यांचे राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, सहकार, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवराकडून अभिनंदन करण्यात आले आहे.