Popular Foods in Maharashtra : महाराष्ट्रातील ‘या’ पदार्थांची चव जगात भारी; एकदा खालं तर पुन्हा मागाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Popular Foods in Maharashtra) महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीविषयी बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडतात. कारण विविध जिल्ह्यातील विविध पदार्थांची काही ना काही खासियत आहे. इथे प्रत्येक भागात बनणारा पदार्थ खास आहे. सुगंधी चविष्ट मसाले, तेल- तुपाच्या खमंग फोडण्या, कोथिंबीर भुरभुरलेले लज्जतदार पदार्थ अहाहा!! नुसतं बोलून तोंडाला पाणी सुटतं. महाराष्ट्रात असे अनेक पदार्थ आहेत ज्यांची चव चाखायला देश विदेशातून देखील लोक येतात. काही पर्यटक तर केवळ या पदार्थांची चव घेण्यासाठी मैलो दूर येतात.

महाराष्ट्रात प्रत्येक पर्यटकांचे विविध पदार्थ खाऊ घालून आदरातिथ्य केले जाते. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या अशाच काही पदार्थांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Popular Foods in Maharashtra) जे एकदा चाखल्यानंतर त्यांची चव जिभेवर रेंगाळत राहते. या पदार्थांचा गंध, चव आणि रुपडं ध्यानी मनी फीट होऊन जातं. हे पदार्थ खाल्ल्यावर एकवेळ पोट भरेल पण मन काही भरत नाही. त्यामुळे एकदा चव घेतली की माणूस पुन्हा पुन्हा मागितल्याशिवाय राहत नाही. चला तर अशा ७ आगळ्या वेगळ्या आणि भन्नाट चविष्ट महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांविषयी माहिती घेऊया.

1. मुंबईचा स्ट्रीट वडापाव

तसं पाहिलं तर वडापाव काय सगळीकडेच मिळतो. पण त्यातही मुंबईचा वडापाव एकदम खास आहे. या स्वप्ननगरीत उराशी अनेक स्वप्न घेऊन येणाऱ्याचं पोट भरायचं काम वडापाव करतो. गरीब काय आणि श्रीमंत काय? प्रत्येकासाठी वडापाव सारखाच. त्यामुळे मुंबईचा स्ट्रीट वडापाव जगभरात प्रसिद्ध आहे. (Popular Foods in Maharashtra) बटाट्याची पिवळी खमंग भाजी आणि त्यासोबत लसूण शेंगदाण्याची चटणी, हिरवी तळलेली मिरची, त्यात जर चुरा असेल तर आणखीच भारी!! मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. शिवाय जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव १३ व्या क्रमांकावर विराजमान आहे.

2. खान्देशी वांग्याचं भरीत

तुम्ही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वांग्याचे भरीत खाल्ले असेल. कधी तिखट मसाल्यात तर कधी काळ्या किंवा गोड्या मसाल्यातील वांग्याचे भरीत आणि सोबत ज्वारीची भाकरी अहाहा!! काय कॉम्बिनेशन आहे. (Popular Foods in Maharashtra) पण त्यातही खान्देशी वांग्याच्या भरीताला काय तोडच नाही. खान्देशात भाजलेल्या वांग्याचं भरीत आणि भाकरी हा अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. जळगाव, धुळ्याला कधी गेलात तर हा पदार्थ जरूर खा. त्याची चव जिभेवर अशी काही रेंगाळते की, पुन्हा पुन्हा हा पदार्थ खावा वाटतो.

3. नाशिक – पुण्याची मिसळ

मिसळ खायची तर पुण्याचीच… नाही नाही नाशिकचीच. अहो कन्फ्युज कशाला व्हायचं? दोन्हीकडे जाऊन मिसळ खा. तृप्त तर होणारच. (Popular Foods in Maharashtra) पुण्याची मस्त लाल कटाची मिसळ आणि नाशिकची तर्रीबाज मिसळ दोन्ही एकदम सरस आहेत. समोर मिसळीचा कट आला कि पाव मोडल्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. कमालीची चव आणि लिंबाच्या फोडीमुळे वाढणारी लज्जत तुम्हाला मिसळीच्या प्रेमात पाडते. त्यामुळे नाशिक- पुण्याच्या मिसळीचा नाद करायचा नाय!!

4. विदर्भाचे सावजी चिकन, मटण (Popular Foods in Maharashtra)

विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील खाद्य संस्कृतीत सावजी चिकन मटण हे अत्यंत लोकप्रिय असणारे पदार्थ आहेत. त्यांची चव कमालीची असते. नॉनव्हेज लव्हर्स तर बोट चाटत बसतील अशी या पदार्थाची चव आहे. मस्त भुरका मारून रस्सा प्यायचा आणि भाकरी मोडून नळी खायची मजा विदर्भात येते. विदर्भाच्या सावजी मसाल्याचा कमालीचा सुगंध तुम्हाला आणखीच आकर्षित करतो. त्यामुळे या भागात कधी गेलात तर चुकूनही सावजी चिकन, मटण टेस्ट करायला चुकू नका.

5. कोकणातील सी फूड

कोकणाला लाभलेल्या भव्य समुद्र किनारा कायमच पर्यटकांना आकर्षित करत असतो. त्यासोबत कोकणातील खाद्य संस्कृती जगप्रसिद्ध आहे. खास करून इथला रत्नागिरी तसेच सिंधुदूर्ग जिल्हा हा सी फूडसाठी खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी माशांचे अनेक प्रकार मिळतात. (Popular Foods in Maharashtra) अत्यंत चविष्ट अशा मसाल्यांमध्ये, कोकम- कैरीसोबत मासे शिजवले जातात. नारळाच्या चवीने माशाची कढी आणखीच लज्जतदार बनवते. शिवाय तळलेले मासे तर खातच राहावे वाटतात. त्यामुळे कोकणात गेलात आणि सी फूड खाल्ला नाहीत तर तुम्ही आयुष्यातील मोठं सुख गमावताय हे लक्षात घ्या.

6. कोकणची सोलकढी

तुम्ही बरीच सरबतं, कोल्ड्रिंक प्यायले असाल. पण जी चव सोलकढीत आहे, ती तुम्हाला कुठेच मिळणार नाही. या चवीसाठी तुम्हाला कोकणातचं जायला हवं. नारळाच्या रसात बनवली जाणारी सोलकढी पित्तनाशक असते. त्यामुळे चवीसोबत ही सोलकढी आरोग्यदायी देखील आहे. आजकाल अनेक हॉटेलमध्ये सोलकढी मिळते. पण जिभेवर चव रेंगाळेल अशी सोलकढी पिऊन तृप्त व्हायचं असेल तर कोकणात जाऊन सोलकढीचा आस्वाद घ्या.

7. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात तांबडा पाढंरा रस्सा खूपच लोकप्रिय आहे. चिकन आणि मटणचा ठसकेबाज रस्सा गरमागरम पिताना जी मजा आहे ती फक्त कोल्हापुरातच येते. (Popular Foods in Maharashtra) तर्रीदार रस्सा भुरका मारून आणि भाकरी कुस्करून खाण्याची लज्जत तांबडा रस्स्यात मिळते. तर जिभेला झणझणीत चटका लागल्यानंतर चटकदार चटका देण्याचं काम अळणी पांढरा रस्सा करतो. रांगड्या लोकांच्या कोल्हापुरात गेलात तर तांबडा पांढरा चाखल्याशिवाय येऊ नका. कारण हा पदार्थ खायचा चुकवलात तर काय मजा.