मुंबई । महाविकास आघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. ‘राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची कोणतीही नाराजी नव्हती. महाविकासआघाडी भक्कम आहे आणि ५ वर्ष चांगलं काम करेल,’ असं बाळासाहेब थोरात या बैठकीनंतर म्हणाले.
‘नाराजीचा विषय नव्हता. काही विषयांची समोरासमोर चर्चा व्हावी लागते. मोठ्या बैठकांमध्ये ही चर्चा होऊ शकत नाही. आज सकारात्मक चर्चा झाली. चर्चेचे विषय प्रशासकीय होते. विभागाच्या चर्चा होत्या. कोरोनाच्या संकटात गरीब माणूस अडचणीत आला आहे, त्याला कशी मदत करता येईल, याबाबत चर्चा होती. कोणताही वैयक्तिक मुद्दा नव्हता,’ अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.
‘न्याय योजना राहुल गांधींनी देशासाठी मांडली आहे. त्याची अंमलबजावणी देश पातळीवर होणं गरजेचं आहे. पण राज्यात गरीब माणूस अडचणीत आहे, त्याला राज्याकडून कशी मदत करता येईल. कोकणात फळबागांचं नुकसान झालंय, त्यांना कशी मदत करायची, यावरही चर्चा झाली,’ असं थोरात यांनी सांगितलं.
‘विधानपरिषदेच्या जागा वाटपाबाबत सत्ता स्थापन करते वेळीच चर्चा झाली. समान वाटप असावं हे ठरलेलं आहे, त्यावर जास्त चर्चा करायची गरज नव्हती. कोणत्याही बैठकीत काँग्रेसला डावललं असं कुठे दिसलं नाही. विकास निधीच्या वाटपाचा विषय असतोच, या निधीचे समान वाटप असावं,’ असं थोरात म्हणाले. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पण कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बाबतीत आज आम्ही चर्चा केलेली नाही, असं थोरात यांनी स्पष्ट केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”