कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरातील भेदा चौकातील गेट नंबर 1 ते बैल बाजार रोड दरम्यान असणाऱ्या रस्ते कामाचा शुभारंभ काल पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर आज मंगळवारी दि. 21 रोजी पोस्टर लावून गांधीगिरी करण्यात आली आहे. या परिसरात सुज्ञ नागरिकांकडून रस्त्यांचे काम सुरू केल्याबद्दल साहेबांचे जाहीर आभार, मात्र काम दर्जेदार आणि टक्केवारी मुक्त व्हावे हीच अपेक्षा लावलेल्या पोस्टरमध्ये म्हटले आहे. पालकमंत्र्याच्या कार्यक्रमानंतर या लागलेल्या पोस्टरनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शहरातील याच परिसरात गेल्या काही महिन्यापासून पोस्टरबाजी करण्यात आलेली होती. गेट नंबर एक ते बैलबाजार रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तेथील नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला आठवण करून देण्यासाठी विविध क्लुप्त्या काढून फलक लावत जनजागृती केलेली आहे. याच परिसरातील रस्त्याच्या कामाचा काल सोमवारी दि. 20 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यानंतर लावलेल्या या पोस्टरमुळे रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने आभार मानताना, कामांची हमी व टक्केवारी यांचा सहभाग होत असतो. तसेच या कामात तरी टक्केवारीमुक्त व दर्जेदारपणा व्हावा, अशी अपेक्षा सुज्ञ नारिकांकडून करण्यात आली आहे.
तीन महिन्यापूर्वी 5 सप्टेंबर व त्यानंतर 3 आॅक्टोंबर रोजी या रस्त्यावर रस्ता करण्यासंदर्भात तेथील नागरिकांनी पोस्टर बाजी करत गांधीगिरी करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तेव्हापासून या परिसरात पोस्टर झळकले की प्रशासनासह नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. त्यानंतर आजही पोस्टर झळकले,त्याचीच चर्चा कराड शहरासह जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
पोस्टर झळकले, मजकूर पहा कसा आहे.
‘रस्त्याचे काम चालू केल्याबद्दल साहेबांचे जाहीर आभार’,
‘रस्त्याचे काम दर्जेदार व टक्केवारी मुक्त व्हावे हीच अपेक्षा’-मी रस्ता बोलतोय,
‘ज्यांनी ज्यांनी रस्त्याचे कामांमध्ये पाठपुरावा केला त्या सर्वांचे आभार’-
एक सुज्ञ नागरिक. अशा आशयाचे फलक पुन्हा लावून गांधीगिरी करण्यात आली आहे.