महाबळेश्वर | पालिकेची सभा रद्द् न करता तहकुब करून पुन्हा पालिकेच्या अनुपस्थितीत नगराध्यक्षांनी केवळ चारच नगरसेवकांच्या उपस्थित 84 विषय मंजुर केले होते. या सभेविषयी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकारी यांनी तक्रारींची दखल घेत, पुढील ओदशापर्यंत या सभेतील मंजुर ठरावांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे.
नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांच्या मनमानी कारभारास कंटाळुन सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवकांनी घरवापसी केली आहे. त्यामुळे बहुमतात असलेला पालिकेतील सत्ताधारी गट हा अल्पमतात आला आहे. नुकतील 84 विषयांवर निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा यांनी 31 मार्च रोजी ऑनलाईन सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या सभेतील काही विषय हे नगराध्यक्षांच्या व्यक्तीगत आर्थिक फायदयाचे आहेत, हे विषय जनतेच्या हिताचे नाहीत. तसेच पालिकेचेही भविष्यात आर्थिक नुकसान करणारे आहेत. याबाबत पालिकेतील विरोधी गटातील 13 नगरसेवकांचे एकमत झाल्याने त्यांनी या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
कोरोम अभावी ही सभा रद्द् होणार असे विरोधी गटातील नगरसेवकांना वाटले परंतु नगराध्यक्षांनी ही सभा तहकुब केली. कोरोना अभावी तहकुब करण्यात आलेली सभा नगराध्यक्षांनी 1 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता बोलाविली. परंतु या दिवशीही 13 नगरसेवक गैरहजर राहीले. ज्यावेळी कोरोना झाला नाही, ती सभा रद्द् करणे आवश्यक आहे. परंतु नगराध्यक्षांनी ती सभा तहकुब केल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी देखिल 1 एप्रिलच्या त्या सभेला हजेरी लावली नाही. मुख्याधिकारी नसल्याने त्या सभेला पालिकेतील सर्व विभागाचे अधिकारी देखिल उपस्थित राहीले नाहीत. तरी, देखिल नगराध्यक्षांनी ती सभा घेतली. या सभेला नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे, नगरसेविका आफरीन वारूणकर व सुनिता आखाडे हे चौघेच उपस्थित होते. या सभेत विषय पत्रिके वरील 84 विषय मंजुर करण्यात आले.
सभा बोलविण्यापुर्वी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक होते. इतर नगरसेवकांच्या प्रभागातील काही विषय आहेत का? याबाबत नगरसेवकांबरोबर चर्चा करणे आवश्यक होते. ज्या सभेला कोरम नाही, अशी सभा रद्द् करणे आवश्यक होते. मुख्याधिकारी यांनी 1 एप्रिलची सभा बेकायदेशीर आहे असे कळविले होते. त्यानंतर सभा रद्द् करणे आवश्यक होते, हे काहीही झाले नाही. तरी सभा झाली व त्या सभेत 84 विषय मंजुर करण्यात आले, म्हणुन विरोधी गटातील 13 नगरसेवकांनी एकत्र येवुन या सभेतील मंजुर ठरावांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला.
विरोधी गटातील उपनगराध्यक्ष अफजल सुतार, किसन शिंदे, जुबेदा मुलाणी, स्नेहल जंगम, श्रध्दा रोकडे, प्रकाश पाटील, उज्वला तोष्णीवाल, संदीप साळुंखे, शारदा ढाणक, विमलताई पारठे, विमलताई ओंबळे, संजय पिसाळ व रविंद्र कुंभारदरे या नगरसेवकांनी एकत्र येवुन नगराध्यक्षांनी बहुमत नसताना सर्वसाधारण सभा घेवुन मंजुर केलेल्या विषयांना हरकत घेवुन तक्रार दाखल केली. या तेरा नगरसेवकांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, उपस्थित नगरसेवकांनी आपल्या आर्थिक हिताचा फायदा करून विषय मंजुर केले आहेत. हे विषय स्थानिकांच्या हिताचे नाहीत तसेच या विषयांमुळे पालिकेचे भविष्यात आर्थिक नुकसान करणारे आहेत.
दरम्यान याच सभेविषयी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी 5 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना सर्व माहीती कळवुन 308 कलमांच्या आधारे तक्रार दाखल केली होती. पालिकेतील 13 नगरसेवकांबरोबरच पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी केलेल्या तक्रारींची दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली. 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी पुढील ओदशापर्यंत या सभेतील मंजुर ठरावांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे.
नगराध्यक्षांनी लोकशाहीचा खून केला ः उपनगराध्यक्ष
सर्वसाधारण सभेत 17 पैकी 3 नगरसेवक असताना सर्व मंजुर करून घेवुन नगराध्यक्षांनी लोकशाहीचा खुन केला असा अरोप केला आहे. जर तीन नगरसेवक पालिकेचा कारभार करणार असतील तर, पालिकेत 17 नगरसेवकांची गजरच काय? असा सवाल पालिकेचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी उपस्थित केला आहे.
नगराध्यक्षा व कुमार शिंदे यांनी कायद्याचा अभ्यास करावा ः डि. एम. बावळेकर
महाबळेश्वर नगरपालिकेत एकूण १८ सदस्य असल्याने सर्वसाधारण सभेसाठी ९ व विशेष सभेसाठी ७ सदस्यांची गणपुर्ती आवश्यक असल्याचे कायद्यामध्ये तरतूद आहे. असे असताना देखील मा.नगराध्यक्षांनी नगराध्यक्षांसह केवळ चार सदस्यांसह सभा सुरु केली व तीच सभा तहकूब केली. हे नियमांच्या विरोधात असल्याने ही सभाच होत नाही त्यामुळे ही सभा रदद करणेच उचित आहे. मा. नगराध्यक्षा व कुमार शिंदे यांनी कायद्याचा अभ्यास करुन पालिकेचे कामकाज करणे आवश्यक आहे. गेल्या चार वर्षांत अश्या पध्दतीने बेकायदेशीर कामकाज करीत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या असून सरकारने याबाबत ठोस पावले उचलून लवकर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे माजी नगराध्यक्ष डि.एम.बावळेकर यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा