कुंभार व्यावसायिक अडचणीत ः लाॅकडाऊन, संचारबंदीमुळे गरिबांचा फ्रिज “माठाच्या” मागणीत घट

औरंगाबाद | उन्हाळ्याला सुरुवात झाली असून मागील काही दिवसांत शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. या काळात थंड पाण्याने तहान भागवण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठाला दरवर्षी चांगलीच मागणी असते. यंदा मात्र माठ विक्रेत्या कुंभाराच्या दुकानाकडे नागरिकांचा ओघ तुरळक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजेच लॉकडाऊन, संचारबंदी याचा फटका या व्यवसायला बसल्याचे चित्र बघण्यास मिळत आहे.

ऊन्हाळ्याची चाहूल लागताच गोरगरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ बाजारात विक्रीसाठी जागोजागी दिसू लागला आहे. रांजण, नळ असलेला माठ, साधा माठ असे विविध प्रकारचे माठ सध्या विक्रीसाठी आलेले आहेत. विविध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या सवलतीच्या दरात फ्रीज तसेच संबंधित इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध करून देत असल्याने व बाजारात कोरोनाची भीतीने नागरिकांचा कल या आधूनिक वस्तूंकडे अधिक वाढत आहे. शिवाय ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातून मिळणाऱ्या पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने माठांच्या मागणीत घट झाली आहे.

परिणामी जिल्ह्यातील कुंभार बांधवांचा व्यवसाय आर्थिक तोट्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात सायंकाळी आठ वाजता पासून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत अंशतः संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सायंकाळी साडे सात वाजता शहरातील सर्व दुकाने बंद होत आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने 7 वाजेनंतर दुकानदाराला सांगण्यात येते की, दुकाने बंद करा. तसेच नागरिकांनाही घराबाहेर पडता येत नाही. त्याचाही परिणाम माठ विक्रीवर होत असल्याचे दिसून येत आहे.

You might also like