परभणी प्रतिनिधी। परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपा ‘युती’ला बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. युतीच्या बंडखोरांनी बंडाचा झेंडा उगारल्यानंतर आता याच बंडखोरीची लागण ‘आघाडी’तील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला देखील लागलेली दिसत आहे.
परभणी विधानसभेसाठी रविराज देशमुख यांचे नाव घोषित झाल्यानंतर, काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सुरेश नागरे यांनी आता बंडाचा पवित्रा घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून परभणी विधानसभा जागेसाठी नागरे यांनी काम सुरु केले होते अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समजते आहे.
पण ऐन वेळी नागरे यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांच्यासहित कार्येकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. काल परभणी विधानसभा मतदार संघासाठी अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला. यामुळे जिल्ह्यातील युतीसोबत आता आघाडीतील बिघाडी देखील समोर येऊ लागली आहे. या बिघाडीला थोपवण्यासाठी प्रदेश पातळीवर नेतृत्व नेमकी काय पावले उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.