हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनचं माझ्याकडे भाजपात जाण्याचा आग्रह करत होते”.असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीत केल्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनीही यावर भाष्य करत होय मी भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होतो अशी कबुलीच दिली आहे. मात्र शरद पवार यांच्याविषयी मान, सन्मान आणि त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्याबरोबर राहिलो असेही सांगायला पटेल विसरले नाहीत.
प्रफुल पटेल यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलयाबाबत ट्विट करत म्हंटल, होय, मी शरद पवारांकडे २००४ सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान आणि त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्याबरोबर राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी आणि जनतेसाठी चांगलं काम करून शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले.”
होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी…
— Praful Patel (@praful_patel) May 19, 2024
आपल्या ट्विटमध्ये ते पुढे म्हणाले, हे देखील खरे आहे की, १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे शरद पवारांना कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करावी लागली. तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो आणि हे ही तितकेच खरे आहे की, २००४ मध्ये कॉंग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद देणं नाकारलं. शरद पवार साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे!”
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
शरद पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं होते कि, २००४ सालापासून प्रफुल्ल पटेल हे मला सतत येऊन म्हणायचे की, आपण भाजपात जाऊया. या निवडणुकीत आपला पक्ष टिकणार नाही. देशात अटल बिहारी वाजपेयी यांना पर्याय नाही. त्यामुळे आपण सगळे जण भाजपात जाऊया. असं ते म्हणायचे. पटेल माझ्याकडे येऊन तासनतास मला आग्रह करायचे. शेवटी मी त्यांना नाही म्हणून सांगितलं.