हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘वंचित भाजपची बी टीम आहे’ 2019 च्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर न्यूज चॅनलपासून काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांनी जनरलाईज केलेलं हे स्टेटमेंट… ज्या प्रकाश आंबेडकरावर (Prakash Ambedkar) वंचितमुळे काँग्रेसच्या दहाच्या आसपास जागांवर मत विभाजनाचा फटका बसल्याचा गंभीर आरोप झाला. त्याच आंबेडकरांनी यंदाच्या लोकसभेला मविआसोबत जात भाजप विरोधात आपली ताकद जोडण्याचा प्रयत्न केला. पण चर्चा फिस्कटली अन् वंचितनं स्वतंत्र उमेदवार दिले… पण मागच्या काही दिवसांतील घडलेल्या घटनांची टाईम लाईन पाहिली तर वंचित भाजपची बी टीम नसून ती ‘व्ही फॉर विल्हन टीम’ आहे की काय? असं बोलायला बराच स्कोप आहे. कारण कागदावर वंचित जरी निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असली तरी भाजपच्या जागांवर काड्या करून त्याचा अप्रत्यक्ष फायदा मविआला मिळवून द्यायचा, याच अजेंड्यावर आंबेडकर चालतायत याची बरीच उदाहरण समोर आली आहेत. आंबेडकर आणि मविआ यांचं दाखवण्यासाठी फिस्कटलं असलं तरी त्यांची अंतर्गत छुपी युती आहे का? वंचितनं भाजपला म्हणजेच महायुतीला नेमकं कोणत्या जागांवर जाम केलंय? आंबेडकरांच्या डोक्यापासून वंचितच्या गोटात नेमकं काय शिजतंय? याचंच केलेलं हे इन डेप्थ एनालिसिस…
वंचित आणि महाविकास आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi And MVA) बोलणी फिसकटल्यानंतर वंचितनं आपले स्वतंत्र उमेदवार जाहीर केले. पण याची सुरुवात झाली ती काँग्रेसला सॉफ्ट कॉर्नर देऊन… काँगेसच्या कोणत्याही सहा जागांवर वंचित बिनशर्त पाठिंबा देईल, असं पब्लिकली सांगून टाकलं. एवढंच नाही तर कोल्हापुरातून काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या शाहू छत्रपतींना आणि बारामतीतून सुप्रिया सुळेंना जाहीर पाठिंबा देऊन आंबेडकरांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली. या दोन्ही जागा तशा महायुतीसाठी प्रतिष्ठेच्या… अशा वेळेस वंचितचा उमेदवार मैदानात असता तर ही गोष्ट महायुतीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडली असती. पण बाळासाहेबांनी आपली मोठी वोट बँक आणि यंत्रणा थेटपणे मविआच्या पाठीशी लावल्याने या दोन्ही जागा मविआसाठी थोड्या सोप्या झाल्यायत…
आता वळूयात विदर्भाकडे. विदर्भातील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ सध्या कुठला असेल, तर तो अमरावतीचा. अमरावतीतून स्टॅंडिंग खासदार नवनीत राणा या भाजपकडून तर बळवंत वानखेडे काँग्रेसकडून खासदारकीच्या मैदानात आहेत. वंचितनं इथून प्राजक्ता पिल्लेवानांना उमेदवारी जाहीर केली होती. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर सुद्धा मैदानात होते. मोठ्या प्रमाणावर दलित मतं फुटणार असल्याने याचा फटका अर्थातच काँग्रेसला बसणार होता. पण अचानक अमरावतीत अनेक ड्रॅमॅटिक घटना घडल्या. आंबेडकरांनी त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देत आपली उमेदवारी मागे घेतली. तर दुसरीकडं आनंदराज यांनीही मत विभाजनाचा फटका नको, म्हणून आपली उमेदवारी मागे घेतली. थोडक्यात अमरावतीत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी आता सरळ लढत पाहायला मिळणारय. भाजपने हिंदुत्वाचा अजेंडा रेटल्यामुळे दलित समाज हा मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात एकवटलाय. वंचित आणि रिपब्लिकन सेनेमुळे ही वोट बँक फुटणार होती. मात्र आता असं न होता, याचा इनडायरेक्ट फायदा हा काँग्रेसच्या उमेदवाराला होणारय. एकूणच अमरावतीतही नवनीत राणा यांना पाडण्यासाठी वंचितनं घातलेली ही खोड आहे का? असंही या घटनाक्रमाकडे पाहिलं जातंय.
27 मार्चला यवतमाळमध्ये वंचितनं सुभाष पवारांना तिकीट दिलं, मात्र शेवटच्या दिवशी उमेदवारी बदलून अभिजीत राठोडांचा फॉर्म भरला. पण काही तांत्रिक त्रुटींमुळे राठोडांचाही अर्ज बाद झाला. आणि वंचित यवतमाळच्या निवडणुकीतून बाहेर पडली. भावना गवळींचं तिकीट कापून राजश्री पाटलांना उमेदवारी दिल्यानं यवतमाळ मध्ये काय होणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं होतं. त्यात शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या यवतमाळ मधून संजय देशमुख हा कडवा प्रतिस्पर्धी ठाकरेंनी मैदानात उतरवला होता. थोडक्यात लढत अटीतटीची होती. त्यामुळे वंचितचा उमेदवार टेक्निकली बाहेर पडल्यामुळे ही गोष्ट नकळतच ठाकरेंच्या पथ्यावर पडणारी ठरली आहे.
या सगळ्यात लेटेस्ट घडामोड पाहायला मिळाली ती सोलापुरात. सोलापुरातून वंचितनं राहुल गायकवाड या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देऊ केली होती. वंचित ज्या काही हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत जागांवर प्रभाव पाडतं त्यात सोलापूरचाही समावेश होतो. ही जागा आधीच अनुसूचित जाती म्हणजेच एससी समाजासाठी राखीव आहे. इथला दलित समाज ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभा असतो, त्याचा विजय निश्चित मानला जातो. 2019 ला दस्तूरखुद्द प्रकाश आंबेडकर सोलापूरच्या जागेवरून लढले होते. त्यांना तब्बल 1 लाख 70 हजार इतकी भरभक्कम मत मिळाल्यामुळे सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. यावरून सोलापुरात वंचित फॅक्टर किती निर्णायक ठरतो, याचा आपल्याला अंदाज बांधता येईल. यावेळेसही वंचितचा उमेदवार मैदानात असल्याने याचा प्रणिती शिंदेंना फटका बसेल, असं एकूण वातावरण तयार झालं होतं. पण अगदी शेवटच्या क्षणी वंचितच्या राहुल गायकवाडांनी माघार घेतल्याने राम सातपुते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपच्या या हक्काच्या जागेवर आंबेडकरांनी पुन्हा एकदा फडणवीसांची कोंडी केली आहे…
हे फक्त एवढ्यावरच थांबलं नाही तर बदलावे लागलेले उमेदवार आणि घोळ पाहून वंचितचं नेमकं डोक्यात काय आहे, याचं कोडं अनेकांना पडलंय. 2 एप्रिलला वंचितनं परभणीतून बाबासाहेब उगलेंना उमेदवारी जाहीर केली. 4 एप्रिलला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उगलेंची उमेदवारी रद्द करुन पंजाब डख यांचा फॉर्म भरला. 2019 ला परभणीत वंचितचे आलमगीर खान उमेदवार होते, त्यांनी दीड लाख मतं घेतली होती पण यंदा वंचितनं तिकीट न दिल्यानं त्यांनी राजीनामा देत बसपाकडून उमेदवारी मिळवली. थोडक्यात परभणीतून वंचित स्वतःहून बॅकफुटला गेली. रामटेक मध्ये झालेल्या उमेदवारीचा घोळ तर देवेंद्र फडणवीसांशी जवळीक वाढल्याने मंगलदास बांदल यांची शिरूर मधून रद्द केलेली उमेदवारी… या सगळ्या घटना कळत नकळत भाजपसाठी गुंता वाढवत जात मविआच्या फायद्याच्या ठरत आहेत… ही सगळी क्रोनोलॉजी नीट समजून घेतली तर वंचित भाजपची बी टीम आहे, असं म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल. याउलट वंचित भाजपच्या जागा पाडण्यासाठीच काड्या करतंय का? असाही कोणी डाऊट घेतला, तर आश्चर्य वाटायला नको…