सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सोनगाव (ता. जावळी) येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना व किसन वीर सहकारी साखर कारखान्याने सन 2012-13 पासून केलेला भागीदारी करार नऊ वर्षांच्या कालखंडानंतर सामंजस्याने संपुष्टात आणला. त्यामुळे प्रतापगड कारखाना आता किसन वीरच्या व्यवस्थापनाकडून मुक्त करण्यात आल्याने प्रतापगड पुन्हा एकदा स्वतंत्र झाला आहे.
शेतकरी सभासदांचा ऊस वेळेत जावा, कामगारांना 12 महिने काम मिळावे, वेळेवर पगार मिळावा, या हेतूने हा करार त्यावेळच्या संचालक मंडळाने केला होता. परंतु कारखान्याचे माजी अध्यक्ष मदन भोसले यांच्या कालखंडातील गेल्या पाच वर्षांत प्रतापगडचे तीन गळीत हंगाम किसन वीर व्यवस्थापनाने बंद ठेवले. यामुळे शेतकरी, कामगारांसह कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कारखाना चालविण्यास देण्याचा मूळ हेतूचे साध्य होत नसल्यामुळे हा करार मोडण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्याबाबत साखर आयुक्तांकडे लवादही दाखल केला होता.
दरम्यान, किसन वीरची निवडणूक लागल्याने आमदार मकरंद पाटील यांनी निवडणुकीवेळी सत्तांतर करा. जावळीचा प्रतापगड जावळीकरांच्या स्वाधीन करण्याचा शब्दही दिला होता. त्यानुसार सत्तांतर झाल्याने किसन वीरचे अध्यक्ष मकरंद पाटील, तसेच संचालक नितीन पाटील यांनी प्रतापगडच्या व्यवस्थापनास करार संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले. यावेळी आ. मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील तसेच प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, दादा फरांदे, नाना पवार, आनंदराव मोहिते व संचालक मंडळ उपस्थित होते. किसन वीर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल प्रतापगडच्या संचालकांनी आभारही मानले.