औरंगाबाद – केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या राज्यातील चार मंत्र्यांतर्फे त्यांच्या विभागातील पाच मतदारसंघात सोमवारपासून जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. मराठवाड्यातील जनआशीर्वाद यात्रा ही परळीपासून सुरू होणार असून २१ ऑगस्टला औरंगाबादेत समारोप होणार आहे. पाच जिल्ह्यांतील ३२ ठिकाणांवरून ही यात्रा जाणार आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यातर्फे यात्रेचे मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली ही जनआशीर्वाद यात्रा परळी येथून सोमवारी (ता.१६) सकाळी आठ वाजता निघणार आहे. त्यानंतर गोपीनाथगडावर जात श्री. मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत ही यात्रा पुढे घेऊन जाणार आहे. पहिल्या दिवशी ही यात्रा गंगाखेड, पालम, लोहा येथून नांदेड येथे जाणार आहे.
मंगळवारी (ता.१७) नांदेड येथे सकाळी ९ वाजात जणार, तेथून अर्धापूर, कळमनुरी, हिंगोली येथे मुक्कामी, बुधवार (ता.१८) हिंगोली, जिंतूरहून परभणी येथे मुक्कामी, गुरुवारी (ता.१९) परभणी, मानवत, पार्थी, सेलू, परतूर, वाटूर, शुक्रवारी (ता.२०) जालना, बदनापूर, शेकटा, करमाड, चिकलठाणा, औरंगाबादेत दाखल होणार. यासह शनिवारी (ता.२१) औरंगाबाद, दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ, हतनूर आणि कन्नड येथे जनआशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे.