औरंगाबाद – वाळूज ते चिकलठाणा असा २० किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे सूतोवाच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लातूर येथील कार्यक्रमात केले. अंदाजे दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पाच्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्थानिक प्रकल्प कार्यालयाकडून ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्यावर काहीही निर्णय झालेला नाही.
विमानतळासमोरील उड्डाणपूल बांधणीबाबत अजून तळ्यात-मळ्यात सुरू आहे. तो पूल बांधण्याचा निर्णय रद्द झाल्यास हा २० किमी लांबीचा प्रस्तावित उड्डाणपूल उभारणीसाठी गती मिळू शकते. हा पूल झाल्यास औरंगाबादचे रूपडे बदलून जाईल. वाळूज ते डीएमआयसी मधील सर्व उद्योग वसाहती कनेक्ट होतील. दळणवळणाचा मोठा ताण संपून जाईल. नाशिक, नागपूरमध्ये अशा प्रकारे पुलांची उभारणी झालेली आहे. त्या धर्तीवर औरंगाबादेत निर्णय झाल्यास मराठवाड्याच्या राजधानीचे भाग्य फळफळेल. नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सांगितले, डीपीआर तयार करण्याचा प्रस्ताव ऑक्टोबर महिन्यात प्रादेशिक कार्यालयामार्फत केंद्रीय खात्याकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप काहीही अभिप्राय आलेला नाही
सध्या चिकलठाणा ते वाळूज या अंतरात छावणी, महावीर चौक, क्रांती चौक, मोंढानाका, सेव्हन हिल्स, सिडको उड्डाणपुलांचा समावेश आहे. २०० कोटींच्या आसपासचा खर्च या पुलांवर झाला आहे. या पुलासाठी १०० कोटी प्रतिकिलोमीटर खर्च अपेक्षित आहे. २० किलोमीटरच्या अंतरासाठी साधारणतः दोन हजार कोटी रुपये लागू शकतील. यात भूसंपादन व इतर बाबींचा समावेश नाही. तसेच पुलाच्या कामाला जेवढा कालावधी लागेल, त्या त्या वर्षांतील कच्च्या मालाच्या वाढीव दराचा त्यात समावेश नसेल. २० किमी लांबीचा पूल कसा उभारला जाईल. त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर कसे असेल, त्यातील अर्थवर्क किती करावे लागेल. याचे डिझाइन डीपीआरनंतर समोर येईल. डीपीआर मंजूर झाल्यानंतर पुलाच्या कामासाठी आर्थिक तरतुदीचा मुद्दा असेल. त्यानंतर निविदा मागविण्यात येतील.