हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मणिपूरमध्ये (Manipur) गेल्या दोन वर्षांपासून वांशिक हिंसाचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग (N. Biren Singh)
यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एन. बिरेन सिंग यांनी आपल्या राजीनाम्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी इंफाळ येथील राजभवनात जाऊन मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
या निर्णयानंतर लगेचच केंद्र सरकारने राज्यातील अस्थिर परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने यासंदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे की, राज्यात परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, सरकार संविधानातील तरतुदींनुसार कामकाज चालवू शकत नाही. त्यामुळे संविधानाच्या कलम ३५६ अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे, मणिपूरमध्ये गेल्या २१ महिन्यांपासून वांशिक हिंसाचार सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. या सगळ्या घडामोडीमुळे राज्यातील नागरिकांची सुरक्षा आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
दरम्यान, मणिपूर विधानसभेचे शेवटचे अधिवेशन १२ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडले होते. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला. विशेष म्हणजे, विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधीच त्यांनी आपला राजीनामा दिला, त्यामुळे हे अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्याचे सर्व सूत्रे केंद्र सरकारच्या हाती गेली आहेत.
वादग्रस्त ऑडिओ टेप समोर
एन. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यापूर्वीच एक वादग्रस्त ऑडिओ टेप समोर आली होती. ज्यात त्यांनी राज्यात शस्त्रास्त्रांची लूट करण्यास परवानगी दिल्याचे म्हणले होते. या टेपच्या फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मागवला होता. या प्रकरणामुळे बिरेन सिंग यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात होती. तसेच, विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर या सगळ्या परिस्थितीत एन. बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला.




