हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाही नाही म्हणता म्हणता, अशोक चव्हाण फुटले. भाजपात गेले. अन् राज्यसभाही मिळवली… लोकसभेच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसला बसलेला हा जणू 440 चा करंटच! या धक्क्यातून सावरत नाही तोच आता अशोक चव्हाणांचा आदर्श घेत आणखीन एक बडा नेता भाजपच्या वाटेवर आहे. सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या या नेत्याला भाजपकडून राज्यपाल पदाची ऑफर देखील आहे. काँग्रेसमधील एका प्रस्थापित चव्हाणांनी पक्षाला कलटी दिल्यानंतर आता आणखीन एक चव्हाण भाजपात जाणार, ही हुल नेमकी याच टाइमिंग ला का उठलीय? काँग्रेसचा हा बडा नेता आहे तरी कोण? भाजपच्या फोडाफोडीच्या अंकाचा पुढचा बळी कोण? सविस्तर पाहूयात
‘सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांना राज्याचे राज्यपाल व्हायचं आहे’ वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केलेला हा गौप्यस्फोट. आंबेडकरांनी मागच्या काही दिवसात अनेक राजकीय भविष्यवाणी वर्तवल्या अन् त्या खऱ्या देखील ठरल्या. हेच लॉजिक पकडत आता कराडमध्ये त्यांनी केलेल्या या वक्तव्याकडे सिरियसली बघितलं जातंय. सातारा काँग्रेसचा विचार केला तर इथून पक्षाचा एकच मोठा चेहरा आहे आणि तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण….त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार जर काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश केला तर महाराष्ट्र काँग्रेसचा राजकीय पटलावरून सुपडा साफ होऊ शकतो. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना गमावणं पक्षाला कसं परवडेबल नाही, हे समजून घेण्याआधी पवारांच्या पॉलिटिकल करिअरचा थोडक्यात आढावा घेऊ.
महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी मोठा राजकीय वारसा आहे. वडील आनंदराव आणि आई प्रेमलाताई हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळालेले… त्या जोरावरच त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. पृथ्वीराज यांनी बीआयटीस पिलानी राजस्थान येथून बीई- ऑनर्स ही पदवी संपादन केली. त्यानंतर उच्च-शिक्षणाकरता ते अमेरिकेला रवाना झाले. बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमएस ही डिग्री त्यांनी मिळवली. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली. राजीव गांधींच्या आग्रहाखातर पृथ्वीराज यांनी सक्रिय़ राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. संसदेच्या सार्वजनिक उपक्रम, विज्ञान व तंत्रज्ञान, वित्त व नियोजन, लोकलेखा, ऊर्जा आणि संगणकीकरण इत्यादी महत्वाच्या समित्यांवर त्यांनी काम केले. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. यावरूनच त्यांच्या दिल्लीतील ‘वजनाची’ तसंच कामाच्या आवाक्याची कल्पना येऊ शकते…
1998 मध्ये ते पहिल्या भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाच्या दौऱ्यावर ते पाकिस्तानला गेले. 1993 मध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या कार्यकारिणीवर ते प्रथम निवडून आले. संसदीय पक्षाचे उपप्रतोद, सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवडून येत राष्ट्रीय प्रवक्ते, आर्थिक धोरण समिती सदस्य, आत्मचिंतन समिती सदस्य, धोरण व निर्धारण समितीचे अध्यक्ष, केंद्रीय निरीक्षक आदी महत्वाच्या पदावर त्यांनी काम केलंय. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. यातून त्यांनी गुजरात, कर्नाटक, जम्मू काश्मीर, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर व सिक्कीम या राज्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली. याच्या पुढच्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवण्याचा मानही त्यांना मिळाला. 2014 मध्ये दक्षिण कराड मधून आमदारकी मिळवत त्यांनी आपला विधानसभेतला वावरही कायम ठेवला…
थोडक्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा दिल्लीचा राजकारणातील आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरील अनुभव हा काँग्रेस पक्षासाठीचा यूएसपी आहे. शांत, संयमी आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांच्या राजकारणाची काही खास गुणवैशिष्ट्य. विविध क्षेत्रातल्या आपल्या या प्रदीर्घ अनुभवाचा वापर ते सध्याच्या सत्ताधारी भाजप सरकारला झोडण्यासाठी वापरत असतात. अनेक धोरणात्मक निर्णयांपासून ते राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडींवर सरकारची कान उघडणी करायला ते विसरत नाहीत. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशोक चव्हाणांमुळे नांदेड आणि आसपासच्या पट्टयातील अनेक मतदारसंघात जसा भाजपाला फायदा होऊ शकतो. अगदी त्याच्या उलट पृथ्वीराज चव्हाण भाजपात आल्यास त्यांच्या अनुभवाचा आणि स्वच्छ प्रतिमेचा वापर भाजपला होईल, हे वेगळ्या शब्दात सांगायला नकोच…विशेष म्हणजे जर का हे दुसरे चव्हाणही भाजपच्या गळाला लागले तर महाराष्ट्र काँग्रेस अस्तित्वहीन होऊन जाईल. रसातळाला गेलेल्या या महाराष्ट्र काँग्रेसला यानंतर उभं राहणं निव्वळ अशक्य होऊन जाईल…
पण प्रश्न हा उरतोच की, ज्या काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांना सारं काही देऊ केलं त्या पक्षाचा हात वाईट काळात बाबा सोडणार का? तर त्यासाठी भूतकाळात थोडासा टोकरून पहावा लागेल. तर काँग्रेस पक्षातील नाराज नेत्यांचा जो जी 23 गट आहे त्यात महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण हेच एकमेव मोठं नाव आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडाळीवर त्यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त सुद्धा केलीय. पक्षात होय बा’ संस्कृती वाढत आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा पराभव होत असूनही त्यावर चिंतन होत नाही. पक्षाशी गद्दारी करणार्या आमदारांवर कारवाई होत नाही, पक्षाची पोकळ असणारे ध्येयधोरणे या सगळ्याच गोष्टींवरून खंत व्यक्त करत नामोल्लेख टाळत गांधी घराण्यासह काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली होती. मागील वर्षभरापासून अशोक चव्हाण भाजपा जाणार अशा अनेकदा वावड्या उठल्या होत्या. पण यावर जेव्हा केव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या चर्चांवर कायम फुल्या मारत यात काही तथ्य नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं होतं. पण शेवट काय झाला, आपल्या डोळ्यासमोर आहेच. याच चव्हाणांनी लोकसभेच्या तोंडावर भाजपात जात खासदारकी मिळवली. अन् राजकीय दृष्ट्या पुन्हा सेटल झाले. सेम टू सेम कंडीशन पृथ्वीराज चव्हाणांसोबतही घडतेय. दोन वर्षांपूर्वीच बाबा काँग्रेस सोडणार असल्याची जोरदार चर्चा झाली होती. कराडमध्ये लागलेले अनेक बॅनर त्याची साक्ष देत होते.
मात्र मीडियामध्ये बरीच चर्चा झाल्यानंतर काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे मला माहित नाही. पण मी काँग्रेसच्या विचाराचा आहे, असं म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याच्या होत असणाऱ्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं क्लिअर केलं होतं. त्यानंतर मात्र या गोष्टीला कधीच हवा मिळाली नाही. पण प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यानं चव्हाण भाजपसोबत जाणार असल्याच्या केलेल्या या दाव्याला नेमका बेस काय? हे मात्र अद्याप कळायला मार्ग नाही. पण एकाच वेळेस काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या या दोन नेत्यांनी भाजपची वाट धरली तर काँग्रेससाठी ही घटना निगेटिव्ह इम्पॅक्ट ठरणारी असेल, एवढं मात्र नक्की…एकूणच प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या दाव्यात खरंच काही तथ्य आहे का? अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाणही भाजपच्या वाटेवर जातील, असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा