कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्यासाठी बंद करण्यात आला आणि वाहतूक सर्विस रस्त्यावरून वळवण्यात आली. मात्र, वाहतुकीला रस्ता अपुरा पडल्याने तब्बल सहा ते सात किलोमीटरच्या महामार्गावर रांगा लागल्या. यातच दहावी-बारावीची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. याबाबात माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तात्काळ सूचना करून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावला. तसेच यापुढे वाहतूक कोंडीचा प्रश्न उध्दभवल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना त्यांनी केले.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले. यावेळी ते म्हणाले की, कराड येथील पुणे-बंगळूर महामार्गावरील मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्याच्या कामामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. अशात दहावी-बारावी परीक्षेचे पेपर असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर जाणे गरजेचे असते. मात्र, त्यांना वाहतूक कोंडीमुळे परीक्षेला वेळेवर जाता येत नाही.
https://www.facebook.com/watch/?v=736887278100114
दरम्यान, महामार्गाच्या कामामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत लक्ष घालून अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली. यावेळी वाहतूक कोंडीबाबत चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केलेल्या आहेत. अधिकाऱ्यांकडून वाहतूक कोंडीबाबत निर्णय घेतले जात आहेत. मात्र, महामार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भात कोणतीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.