व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुणे-बंगळूर महामार्गावर कराड हद्दीत ‘या’ वेळेत अवजड वाहतूक बंद राहणार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पुणे-बंगळूर महामार्गावर कराड येथे सुरू असलेल्या उड्डाण पुल कामाचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. याचा फटका नागरिकांसह दहावी-बारावी परिक्षार्थींना बसत आहे. परिक्षा कालावधीत महामार्गावर सकाळी 8 ते 10 या वेळेत गोल्डन हावर्समध्ये अवजड वाहतूक बंद करण्याबरोबर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आ. पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील उपस्थित होते.

यावेळी आ. चव्हाण म्हणाले, सध्या संगम हॉटेल व ढेबेवाडी फाटा येथील पुल पाडण्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याचा परिणाम दहावी-बारावीची परिक्षा देणार्‍या विद्यार्थी-पालकांवर होत आहे. या परिक्षा कालावधीत तसेच काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी मार्गासंदर्भात प्रांताधिकारी, पोलीस उपअधिक्षक व सार्वजनिक बांधकाम विभाग, कराड-मलकापूर पालिकेच्या अधिकार्‍यांसोबत आज बैठक झाली आहे. परिक्षा कालावधीमध्ये सकाळी 8 ते 10 या गोल्डन हॉवर्समध्ये महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

कोयना नदीवरील जूना पुल मजबूत करण्यात आल्यामुळे याचा शहरातून बाहेर पडणार्‍या हलक्या वाहनांना चांगला उपयोग होत आहे. या मार्गावर वारूंजी फाटा येथे स्ट्रीट लाईट, रिफलेक्टरसह सूचनांचे फलकही लावण्यात येणार आहेत.  याचबरोबर महामार्गावर संगम हॉटेलसमोर व ढेबेवाडी फाटा येथे कंट्रोल रुम उभारण्यात येणार असून याद्वारे वाहतुक नियंत्रणीत केली जाणार आहे. तसेच महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदारांचे कर्मचारी, होमगार्ड, पोलीसही तैनात करण्यात आले आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण, समस्या असल्यास नागरिकांनी थेट मला फोन करून माहिती द्यावी, असे आवाहनही आ. चव्हाण यांनी केले आहे.

अशी आहे नवीन पर्यायी व्यवस्था

कराड शहरातून कोल्हापूरकडे जाणार्‍यांसाठी बैलबाजार, मलकापूर, नांदलापूर या पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संगम हॉटेलसमोरील पुल पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून येथील मलबा दोन दिवसात काढण्यात येणार आहे. यानंतर येथून सातारा पुण्याकडे जाण्यासाठी शहरातून बाहेर पडणारी अवजड वाहतूक वळविण्यात येईल. तसेच ढेबेवाड फाटा येथे पूर्णपणे दोन लेन वाहतुकीसाठी मोकळ्या ठेवण्यात येणार आहे. येथे होणार्‍या पार्किंगचा अडथळा होणार नाही याची ही काळजी घेण्यात आली आहे.

असा असणार नवीन पूल

नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीबरोबर येथील उड्डाणपुलाच्या डिझाईन संदर्भात गेली दोन वर्षांपासून चर्चा सुरू असून आम्ही सुचवलेले डिझाईन त्यांनी मान्य केले आहे. या डिझाईननुसार देशातील महत्वाच्या पुलामध्ये या पुलाचा समावेश करण्यात आला आहे. एका पिलरवर सहा लेन व खाली आठ लेन असणार आहेत. कराड-मलकापूरमधून जाणारा हा मार्ग 14 लेनचा असणार आहे. याचे काम किमान दोन वर्षे सुरू राहणार असल्याची माहिती आ. चव्हाण यांनी यावेळी दिली.

महामार्गावर प्रयोगीग चाचणी

परिक्षा कालावधीत सकाळी 8 ते 10 या वेळेत महामार्गावरून होणारी अवजड वाहतूक बंद करण्याची प्रयोगीक चाचणी मंगळवारी घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली. ते म्हणाले, या दोन तासांमध्ये पंधरा मिनिटामध्ये 60 अजवड वाहने थांबविण्यात आली आहे. थांबविलेली वाहनांची रांग सुमारे सव्वा किमी होती. हीच वाहतूक दोन तास थांबविली तर सुमारे 200 ते 250 अजवड वाहने थांबली जातील तर याची रांग सुमारे 8 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. तसेच ही वाहतुकी खुली झाल्यानंतर फक्त 20 मिनिटातच वाहतूक पूर्ववत सुरू होईल. संगम हॉटेल ते नांदलापूर या अंतरावर सुमारे 13 सीसीटीव्ही बसविण्यात आल्या आहेत.