कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोना काळातही राजकारण करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आणलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम जनशक्तीचे कथित गटनेते राजेंद्रसिंह यादव करत आहेत. खोट बोल पण रेटून बोल या जनशक्तीच्या प्रवृत्तींचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण गट सक्रीय आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी जे जे काम आणले, त्याचे श्रेय कोणी लाटण्याचे काम करू नये. त्यांना आमचे आव्हान आहे असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले.
कराड नगरपालिकेत आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाकीर पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/3903507079745139
शिवराज मोरे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केटसाठी दोन कोटीसह अन्य विकासासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे ८.५० कोटींचा निधीच्या मागणीचे पत्र दिले होते. त्यानुसार पृथ्वीराज बाबांनी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खास बाब म्हणून छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केटसाठी दोन कोटी इतक्या निधीची मागणी केली होती. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याने हा निधी मंजूर केला आहे. मात्र तो निधी आम्ही आणल्याचा कांगावा जनशक्तीचे नेते करत आहेत, तो खोटा आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकास केल्याचे कराडच्या जनतेची फसवणूक करत आहेत.
कराड नगरपालिकेचे नगरसेवक तथा शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने म्हणाले, जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी मागील निवडणुकीत पृथ्वीराज बाबांच्या प्रतिमेचा उपयोग कराड नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी केला. तो प्रयत्न यशस्वी झाला होता, परंतु याच नगरसेवकांनी पृथ्वीराज बाबांशी काही दिवसातच गद्दारी करून त्यांचा विश्वासघात केला. आजही पृथ्वीराज बाबांचे केलेलं विकासकाम स्वतः केले असल्याचे जनतेला भासवत आहेत.
नगरसेवक इंद्रजीत गुजर म्हणाले कि, मूळच्या जनशक्तीचा कराडच्या जनतेमध्ये विकासकामे करण्याची एक वेगळी पद्धत होती. त्या जनशक्तीच्या नावाला हायजॅक करण्याचे काम राजेंद्र यादव यांनी केले. आमचे नेते माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज बाबांच्यासह जनशक्तीच्या मूळ नेत्यांचा सुद्धा विश्वासघात राजेंद्र यादवांनी केला. त्यामुळे हे काय कराडचा विकास करणार? उलट त्यांनी श्रेय लाटण्याचे व विश्वासघाताचे प्रकार बंद करावेत.
कराड शहराचे बजेट आजही मंजूर नाही
नगरपालिकेचे कराड शहराचे अर्थसंकल्पीय बजेट अद्यापही मंजूर नाही. बजेटवर जिल्हाधिकाऱ्यांची सही झालेली नाही. काहीजण आयत्या पिठावर रेघोट्या अोढत आहेत. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण गट कराड शहराच्या विकासाठी सक्रीय आहे. त्यामुळे बाबांच्या विकासकामांचे श्रेय कुणी घेत असल्यास आमचे त्यांना आव्हान आहे.