कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात त्याचे मोठं राजकीय पडसाद उमटले. राज्यपालांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील राज्यपालांवर निशाणा साधत ते मुद्दामहून अशा प्रकारची विधाने करत असल्याचे म्हंटल. ते कराड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोशारी हे जाणून-बुजून वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांना खरे तर हिमाचल प्रदेशला पुन्हा जायचं आहे. राजकारणात सक्रिय व्हायचे आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना जाऊ देत नाहीत, त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचे आहे. त्यामुळे त्यांना कोपऱ्यापासून नमस्कार केलेला बरा अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावर सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींनी सावरकरांच्या बाबतीत स्पेफिफिक विधान केलं आणि तुम्ही कशाचा आधारवर बोलता असा प्रश्न मीडियाने केल्यानंतर त्यांनी पुरावा दिला. भाजपने हा मुद्दा डोक्यावर घेतला, परंतु त्यापेक्षा त्यांनी उत्तर दिले पाहिजे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
कर्नाटकचा जत तालुक्यावर डोळा; रोहित पवार शिंदे- फडणवीस सरकारवर संतापले
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/KbqQFC3y4t#Hellomaharashtra @RRPSpeaks
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2022
राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले ?
औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील असं कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले.