हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिचर्ड ॲटनबरो यांचा 1982 चा गांधी (Mahatma Gandhi) चित्रपट होईपर्यंत जगाला महात्मा गांधींबद्दल फारशी माहिती नव्हती असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केल्यानंतर विरोधकांनी मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना त्यांच्या या विधानाबाबत चोख प्रत्युत्तर दिले होते, आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदींसारखी व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे, हे आपलं दुर्देवं आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हंटल आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांचे शिक्षण बेताचं झालं आहे किंवा त्यांचे शिक्षण झालेलं नाही, असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळे महात्मा गांधींचं जगात काय महत्त्व आहे, याची त्यांना जाणीव नाही. खर तरं सिनेमा बघूनच त्यांची आणि महात्मा गांधींची ओळख झाली असावी आणि ते सिनेमा बघून खूप प्रभावित झाले असावे, त्यामुळे जग महात्मा गांधींना सिनेमा बघून ओळखू लागले, असं हास्यास्पद विधान त्यांनी केलं आहे, खरं तर मोदींना आता बोलायला काही मिळालं नसल्याने त्यांनी गांधींवर राग काढला आहे. अशी व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे, हे आपलं दुर्देवं आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.
महात्मा गांधी म्हणजे सूर्य – राहुल गांधी
राहुल गांधींनी सुद्धा मोदींच्या महात्मा गांधींवरील विधानावर समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर याबाबत एक विडिओ शेअर करत म्हंटल, “ज्यांच्या जगाचा दृष्टिकोन शाखांमध्ये तयार होतो ते गांधीजींना समजू शकत नाहीत. असे लोक गोडसेला समजतात… गोडसेच्या मार्गावर चालतात. गांधीजी हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान होते. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइन्स्टाईन, हे सर्व लोक महात्मा गांधींपासून प्रेरित आहेत. भारतातील कोट्यवधी लोक महात्मा गांधींचा मार्ग अवलंबून सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबतात.” ही लढाई सत्य आणि अहिंसेसाठी आहे… ती हिंसा आणि अहिंसेवर आहे… जे लोक हिंसा करतात त्यांना सत्य समजू शकत नाही असा टोला राहुल गांधींनी मोदींना लगावला.
महात्मा गांधी हे सूर्य आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला अंधाराशी लढण्याची ताकद दिली. बापूंनी जगाला सत्य आणि अहिंसेच्या रूपात एक मार्ग दाखवला, जो दुर्बल माणसालाही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत देतो. त्यामुळे शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.