हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. महामार्गावरील कराडनजीक असलेल्या मलकापूर येथे भराव पुल पाडण्यात येत आहे. या पुलाच्या कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी नुकतीच कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय राजमार्ग प्राधिकरण व डीपी जैन कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. यावेळी “जून महिन्यात शाळा सुरू होत आहे. पाच दिवसात 5 जूनपर्यंत पुलाचे पाडण्याचे काम पूर्णकरावे. पूल पाडल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांच्या वाहतुकीची गैरसोय दूर करण्यासाठी रस्ते तयार करावेत,” अशा महत्वाच्या सूचना माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापुरात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या मलकापुरातील उड्डाण पुलाच्या कामाची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच सुरु असणाऱ्या 6 लेन उड्डाणपुलाच्या कामादरम्यान वाहतुक व्यवस्थेबाबत निर्माण होत असलेल्या अडचणीबाबत संबंधित ठेकेदारांशी चर्चाही केली.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड व मलकापूर येथील उड्डाण पुलाचे काम करत असताना या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतुकी संदर्भात कोणत्याही अडचणी निर्माण होऊ देऊ नये. याची जबाबदारी भारतीय राजमार्ग प्राधिकरण व डीपी जैन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. मलकापूर शहरातून विद्यानगर व कराड या ठिकाणी शाळा व महाविद्यालयात विद्यार्थी ये-जा करणार आहेत. या विद्यार्थ्यांची कोणत्याही स्वरूपाची गैरसोय होऊ नये. तसेच पुलाच्या कामाचा मलकापूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व सांडपाणी प्रक्रिया पाईप लाईनला धोका पोहचू नये याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी.
कोल्हापुरात पार पडलेल्या बैठकीला जखीणवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र पाटील, डी. पी. जैन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार जैन, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, विरोधी पक्षनेते अजित थोरात, नारायण रैनाक, राजू मुल्ला यांची उपस्थिती होती.
असा असणार नवीन पूल
नॅशनल हायवे अॅथोरिटीबरोबर येथील उड्डाणपुलाच्या डिझाईननुसार देशातील महत्वाच्या पुलामध्ये कराड व मलकापूर येथील उड्डाण पुलाचा समावेश करण्यात आला आहे. एका पिलरवर सहा लेन व खाली आठ लेन असणार आहेत. कराड-मलकापूरमधून जाणारा हा मार्ग 14 लेनचा असणार आहे. याचे काम किमान दोन वर्षे सुरू राहणार आहे.