कराड | कुटुंबाच्या उन्नतीसाठी माता- भगिनी कष्ट घेत असतात. गौरीचा सण नुकताच झाला. मात्र, आपल्या घरातील गौरीलाही पाठबळ दिले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. मारूल हवेली (ता.पाटण) येथे श्रीनिवास पाटील फाउंडेशन व मारूल हवेली ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेला महिला उद्योजक व बचत गटांच्या उत्पादित मालाचा विक्री महोत्सव बुधवार दि.7 रोजी संपन्न झाला.
महोत्सवाचे उद्घाटन सारंग पाटील यांच्या हस्ते व श्रीनिवास पाटील फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा सौ.रचना पाटील, शेली लुथ्रा, कुणाल घोडके, सर्वेश जाधव, माधवी वनारसे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. सारंग पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील महिला जागृत होत असून बाह्य जगातील स्पर्धेत त्या उतरू लागल्या आहेत. त्यांच्याकडे विविध कला कौशल्ये असून त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात त्या पुरूषांच्या बरोबरीने उभ्या राहत आहेत. त्यांना उभारी देताना समाजाने प्रोत्साहन, पाठबळ द्यावे. त्यांच्या उद्योग व्यवसायांना हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी स्वागत सरपंच अशोक मगरे यांनी केले. प्रास्ताविक प्रविण कोळपे यांनी केले. तर आभार राजेंद्र नांगरे यांनी मानले.
महोत्सवात मारूल हवेली विभागाच्या विविध गावातील बचत गटांचा सहभाग ः- विक्री महोत्सवात महिलांनी बनवलेल्या देशी परंतु चमचमीत पदार्थांनी खवय्यांचे लक्ष वेधले होते. यामध्ये आंबा लोणचे, करवंद लोणचे, लसूण लोणचे, चकली, उकडीचे मोदक, तांदूळ, पालक व नाचणी पासून बनवलेले पापड, भाकरवडी, अनारसे, जवस चटणी, कारळा चटणी, वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया यांचा समावेश होता. यासह अंगणवाडीचे मिशन धाराऊ, बचतगटांनी बनवलेले बॅग्ज आणि पर्स, आकर्षक अलंकार अशा वस्तूंच्या खरेदीला नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. महिलांच्या पाक कला स्पर्धेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. विजेच्या स्पर्धकांना आकर्षण बक्षिसे भेट देण्यात आली.