पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने फेसबुक पोस्ट करत सासवड येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर फेसबुकवर लिहिलेली पोस्ट वाचून अनेक विद्यार्थ्यांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. काल दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट करून आपले जीवन संपवले. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
आत्महत्या करणाऱ्या प्राध्यापकाचे नाव प्रफुल्ल दादाजी मेश्राम असे असून ते कात्रज याठिकाणी वास्तव्याला होते. मृत प्रफुल्ल मेश्राम हे कमिन्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या फेसबूक अकाउंटवर “बाय बाय डिप्रेशन,” “सॉरी गुड्डी” अशा आशयाची पोस्ट केली होती. यानंतर त्यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका शेतामधील विहिरीत उडी मारून आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. मेश्राम यांची पोस्ट पाहून त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांची शोधाशोध सुरू केली पण त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर नातेवाईकांनी या घटनेची माहिती सासवड पोलिसांना दिली.
यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता भिवरी गावातील एका विहिरीजवळ मेश्राम यांची चप्पल, गाडीची चावी, पॉकेट, मोबाईल, हेडफोन, रुमाल या वस्तू आढळल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सासवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विहिरीत शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह आदळून आला. मेश्राम यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. काही दिवसांपूर्वी मेश्राम यांना अर्धांग वायूचा झटका आला होता. यातून ते बरेसुद्धा झाले होते. पण मागच्या काही काळापासून त्यांना नैराश्याने ग्रासले होते. ते कोणाशी बोलतसुद्धा नव्हते. याच मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मुलीची माफी मागितली असून आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही कारणीभूत धरू नये, असेदेखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. सासवड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.