औरंगाबाद – कोरोना व लॉकडाऊन मुळे गेल्या दीड वर्षांपासून शासनाने शाळा बंद ठेवल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे त्यामुळे शैक्षणिक प्रगती मनाप्रमाणे झाली नाही. परिणामी भविष्यात आपण यशस्वी होणार नाही, अशी चिंता सतावत असलेल्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल सकाळी खादगाव (ता. गंगापूर) येथे घडली. तनुजा उत्तम पाटेकर असे या मुलीचे नाव आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी नसल्याने शवविच्छेदन करण्यासाठी मुलीचा मृतदेह तब्बल तीन तास आरोग्य केंद्रात तसाच पडून होता.
याविषयी अधिक माहिती अशी की, खादगाव येथील शेतकरी उत्तम पाटेकर हे अल्पभूधारक असल्याने खाजगी कंपनीत रोजंदारी ने काम करत कुटुंबाचा गाडा हाकत होते. त्यांना चार मुली आहेत यात तनुजा ही सर्वात मोठी व ती नववीत शिकत होती. चांगले शिक्षण घेऊन भविष्यात मोठे होण्याचे व कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न अनुजाने उराशी बाळगले होते. परंतु, कोरोनामुळे शासनाने शाळा बंद करून ऑनलाईन शिक्षण सुरू केले होते यात शैक्षणिक प्रगती मनाप्रमाणे होत नसल्याने तिला भविष्यात अडचणी येणार असल्याची चिंता सतावत होती.
शनिवारी रात्री तनुजा आजी-आजोबांच्या खोलीत झोपी गेली पहाटे उठून ती मागच्या खोलीत गेली. मात्र, सकाळी उठल्यावर पाहिले असतात अनुजाने गळफास घेतल्याचे उघडकीस आले तनुजाला शैक्षणिक प्रगतीची चिंता सतावत होती. त्यातून तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.