लव्हगुरु | विशाल विमल गणपत
प्रपोज करणं, कुणी अगोदर प्रपोज केलं, हा खरे तर प्रेम प्रकरणातील अवास्तव महत्व दिलेला विषय आहे. प्रेम आहे, ते शब्दातून व्यक्त करणं-सांगणं याच्या भोवती सुरुवातीचे अनेक महिने, वर्षे तरुणतरुणी खर्ची घालतात. प्रेम आहे-नाही हे सांगण्यासाठी नको तितके एकमेकांच्या मागे पळत राहतात. यातून मानसिक अस्थिरता, स्वाभिमान दुखावणं आणि त्या मुलाच्या अथवा मुलीच्या मानवी प्रतिष्ठेला धक्का बसतो, हे लक्षातच घेतले जात नाही.
माझं तुझ्यावर प्रेम आहे, इतकं बोलून हे प्रकरण इथं थांबत नाही, तर तुझं प्रेम आहे की नाही, या होकार-नकारात खूप मोठी फरफट होते. आणि लगेच कुणी होकार जरी तिला तरी ते निसर्गसुसंगत नाही.
खरे तर प्रेम आहे किंवा नाही, हे प्रेमात सांगायची गरजच पडली नाही पाहिजे. ओळख, परिचय, संवाद, मैत्री, प्रेम असे प्रेमप्रकरणापर्यंतचे टप्पे आहेत. यातील संवाद आणि मैत्री हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. संवाद जोपर्यंत खोलवर होत नाही, तोवर मैत्री, प्रेम होतं नाही. संवादातून क्षमता-मर्यादा लक्षात येतात. मैत्रीमध्ये दोघांमधील क्षमता-मर्यादा मान्य केल्यानेच मैत्री टिकून राहते, हे मैत्रीतील बलस्थान आहे. याच मैत्रीच्या नात्यातुन प्रेम फुलते. मैत्रीच्या कृतीप्रवनतेतून प्रेम उमलू लागते. मात्र मैत्री आणि प्रेम यातील सीमारेषा धूसर असते. प्रेमात देखील एकमेकांच्या क्षमता-मर्यादा मान्य असल्याशिवाय ते होतं नाही. मैत्रीत देखील प्रेम असतं.
एकंदरीत प्रेमापर्यंतचा प्रवास हा हसल्या-देखल्यातुन झालेला नसतो. इथवरचा प्रवास हा बोलून – चालून आणि माणूस समजावून घेतघेत झालेला असतो. अशा या टप्प्यावर आलेल्या नात्यात प्रेम आहे की नाही, हे सांगण्याची गरज पडत नाही. पण आजचे चित्र हे प्रेम आहे किंवा नाही, हे सांगण्यात गुरफटलेले असल्याचे दिसते. याचे एकमेव कारण इतकेच आहे की, प्रेमापर्यंतचे टप्पे टाळून हसल्या-देखल्याच्या मोहाला भाळून थेट प्रेम हवं आहे. एकमेकांचा परिचय नाही, ओळख नाही, संवाद नाही, मैत्री नाही आणि थेट प्रेम हवं आहे. आणि म्हणून प्रेम आहे किंवा नाही, हे सांगण्या-विचारण्याचा मोह आवरता येत नाही.
शेवटचा मुद्दा म्हणजे, कुणी कुणाला पहिल्यांदा प्रपोज केलं, हा मुद्दा प्रेमप्रकरणात जास्त चर्चिला जातो. ज्याने प्रपोज केला तो कसा मागेमागे पळत होता, हे दाखवून, मी म्हणजे कोणतरी भारी असल्याचे दाखविण्याचा प्रकार आहे. खरे तर यातून त्या पुढच्या व्यक्तीला अपमानित करण्यासारख आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.