नवी दिल्ली | देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच दिल्लीत मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलक शेतकर्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश करुन आपला झेंडा फडकवला आहे. यामुळे दिल्लीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
#WATCH A protestor hoists a flag from the ramparts of the Red Fort in Delhi#FarmLaws #RepublicDay pic.twitter.com/Mn6oeGLrxJ
— ANI (@ANI) January 26, 2021
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. नव्या कृषी कायद्याविरोधात आक्रमक झालेले शेतकऱी आज राजधानीत प्रवेश करत असून ट्रॅक्टर मोर्चा काढत शक्तीप्रदर्शन करत आहेत. राजपथावरील संचलनानंतर शेतकऱ्यांना मोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अनेक ठिकाणी पोलीस व शेतकरी यांच्यात संघर्ष होत आहे. काही ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर हल्लाबोल केला आहे. पोलिसांनाही यावेळी काही ठिकाणी लाठीचार्जबरोबरच अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आहेत.
Delhi: Flags installed by protestors continue to fly at Red Fort. #FarmLaws #RepublicDay pic.twitter.com/U0SZnTw4Wn
— ANI (@ANI) January 26, 2021
दिल्ली व हरयाणाच्या तिकरी सीमेवर शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह दाखल झाले आहेत. हे शेतकरी किसान मजदूर संघर्ष समितीचे आहेत. २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीच्या दिशेने निघालेले शेतकरी आक्रमक झाले असून गाझीपूर सीमेवर पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स शेतकऱ्यांनी तोडले. यामुळे मोठ्या संख्येने पोलिसांच्या दिशेने येणाऱ्या या शेतकरी जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलनकर्ते अधिकच चिडले आहेत. तर दुसरीकडे सिंघु सीमेवरही शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांबरोबर वाद घातला आहे.
शेतकऱ्यांच्या संख्येत वाढच होत असल्याने पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गावरून न जाता शेतकरी वेगळ्याच मार्गाने दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने घातपाताची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दिल्लीच्या मुकरबा चौकात पोलीस व आंदोलक यांच्यात संघर्ष झाला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला. ग्रीन लाईनवरील सर्व मेट्रो स्टेशनचे एन्ट्र अन् एक्झिट गेट बंद करण्यात आले आहेत.