अभिमानास्पद यश : हनुमानवाडीच्या शेतकऱ्याची मुलगी झाली लेफ्टनंट कर्नल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड  | एका गाववाडीतील शेतकऱ्यांच्या मुलीने जिल्हा परिषदेच्या शाळेतून थेट सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल पदावर झेप घेतली आहे. कराड तालुक्यातील हनुमानवाडी येथील मेजर या पदावरून मीनल शिंदे- चव्हाण हिची लेफ्टनंट कर्नल या पदावर झालेली निवड गावासाठी नव्हे तर तालुका व जिल्ह्यासाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे.

सातारा जिल्हयातील हनुमानवाडी या छोटयाशा गावात शेतकरी कुटुंबात 18 जुलै 1986 रोजी लेफ्टनंट कर्नल मिनल शिंदे-चव्हाण यांचा जन्म झाला. लेफ्टनंट कर्नल मिनल शिंदे याचं बालपण हनुमानवाडीसारख्या छोटयाशा गावात गेलं. प्राथमिक शिक्षणही त्यांनी गावातच पूर्ण केलं. आपल्या लेकीनं शिकावं. मोठं व्हावं, ही वडील अरुण शिंदे आणि आई सौ. शकुंतला शिंदे यांची प्रबळ इच्छा आणि धडपड होती. पण गावात माध्यमिक व उच्च शिक्षणाची सोय नव्हती. आईवडीलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिनल शिंदे-चव्हाण यांनी रोज साडेतीन किलोमीटर पायी चालत जाऊन शिक्षण घेतले.

आईवडीलांच्या पाठबळामुळे आणि जिद्दीमुळे पुन्हा ऊब्रजच्या महात्मा गांधी महाविद्यालयात 11 वीला प्रवेश घेतला. 12 वी मध्ये शिवाजी विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळाली, उंब्रजच्या महिला महाविद्यालयातूनच बी.ए. (इंग्लिश लिटरेचर) पुर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणामध्येच त्यांना देशसेवेसाठीचे धडे मिळाले. या वाटचाली मिनल हिला शिक्षक असलेले चुलते मानसिंग शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मिनल शिंदे यांचा विवाह 12 नोव्हेंबर 2012 रोजी एपीआय सुशांत चव्हाण यांच्याशी झाला. लग्नानंतरही सैन्य दलात सेवा करण्यासाठी सासरमधून त्यांना सासू सासरे आणि पती यांचे सक्रीय पाठबळ लाभले.

मिनल यांची उल्लेखनीय कामगिरी

मिनल हिने रात्र- दिवस अभ्यास करून यश संपादन केले. सन 2007 मध्ये लेफ्टनंट कर्नल मिनल शिंदे यांची आर्मीमध्ये निवड झाली.  2007 ते मार्च 2008 या कालावधीत ओटीए चेन्नईमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. 22 मार्च 2008 रोजी सैन्य दलातील खडतर प्रशिक्षणानंतर आर्मीमध्ये त्या मेजरपदी रुजू झाल्या. तो क्षण आई-वडीलांची स्वप्नपूर्तीचा क्षण ठरला. जम्मू काश्मिर, पंजाब, हिमाचल, लेह-लडाख येथे आर्मीमध्ये खडतर सेवा केली आहे. महाराष्ट्र एनसीसी बटालियन कोल्हापूर येथे कमांडींग ऑफिसर म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. सैन्य दलातील सेवा काळात सर्वोत्कृष्ठ सैन्य सेवेबद्दल भारतीय आर्मीने लेफ्टनंट कर्नल मिनल शिंदे-चव्हाण यांना देशपातळीवरील मानाचे समजले जाणारे आर्मी कर्मेडेशन मेडलने सन्मानित करण्यात आले. ही बाब कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारीच आहे. तर 22 मार्च 2022 रोजी लेफ्टनंट कर्नल पदी झालेली निवड ही सातारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.