औरंगाबाद | गतवर्षी राज्य सरकारने कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या जागेत कोवीड हॉस्पिटल विकसित करून ते चालवण्यासाठी महापालिकेला दिले. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून आजवर या हॉस्पीटलवर शासन निधीतून खर्च केला जात आहे. मात्र आता यासाठी यंदा पालिकेने बजेटमध्ये 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कोरोनासोबतच साथ रोग चिकित्सा व निर्मुलन हॉस्पिटल येथे विकसित करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
शहरात गतवर्षी कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. त्यामुळे पालिकेने सरकारी वसतिगृह, महाविद्यालयांच्या इमारती, विद्यापीठाच्या इमारती ताब्यात घेऊन कोवीड केअर सेंटर सुरू केले. याच दरम्यान शहरातील गंभीर परिस्थिती पाहता राज्य सरकारने चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या जागेत 300 बेड्सचे हॉस्पिटल उभारले. हॉस्पिटल नंतर पालिकेकडे हस्तांतरित केले. सध्या याठिकाणी डेलीकेड कोवीड सेंटर (डिसीएचसी) सुरू आहे.
या हॉस्पिटलमध्ये निम्म्या बेड्सला ऑक्सिजनची व्यवस्था आहे. काही आयसीयूचे बेड देखील अलीकडे सुरू केले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांसाठी हे हॉस्पीटल मोठा आधारवड ठरले आहे. आगामी काळात कोरोना संसर्ग संपल्यानंतर याठिकाणी साथ रोग चिकित्सा व निर्मुलन रुग्णालय सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. ते सुरू झाल्यास मराठवाड्यातील रुग्णांना त्याचा फायदा होईल, असे सांगितले जात आहे.
याठिकाणी ऑक्सिजन प्लांट देखील आता उभारला जात आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने साडेतीन कोटींचा निधी दिला आहे. सोबतच बजाज कंपनीने सीटी स्कॅन मशीन दिले आहे.दरम्यान, आजवर येथील खर्च शासन निधीतून केला जात होता. मात्र 2021-22 या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये पालिकेने 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे मेल्ट्रॉनमध्ये साथरोग चिकित्सा व निर्मुलन रुग्णालय विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा