कराड | मलकापूर येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेची माजी विद्यार्थिनी कु. पूजा कृष्णत शिर्के हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींच्या गटात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात व संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती थोरात व मलकापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात यांचे शुभहस्ते व कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे व सर्व शिक्षक, शिक्षिका, यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
अशोकराव थोरात म्हणाले, शेतकरी कुटुंबातील कु. पूजा शिर्के हिचे हे यश नक्कीच आपल्या सर्वासाठी अभिमानास्पद आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिने आई वडिलांच्या कष्टाचे सार्थक केले आहे. महाराष्ट्रातून ओबीसी प्रवर्गातून मुलींमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवून तिने आपल्या संस्थेचे, कन्याशाळेचे शिक्षणक्षेत्रातील महत्व अधोरेखित केले असून तिचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल असे मत व्यक्त केले.
यावेळी पर्यवेक्षक सुरेश राजे, शाळेतील उपशिक्षिका प्रमिला शेलार, जयश्री पाटील, सविता कोळी, उपशिक्षक प्रकाश पाटील, योगेश खराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.जयश्री पाटील यांनी केले तर आभार प्रकाश पाटील यांनी मानले.