हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीइतका महाराष्ट्रात एनडीएचा मार्ग यावेळी सोपा नसेल. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानभूती आहे. असं स्पष्ट मत अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. एनडीटीव्हीशी खास बातचीत करताना भुजबळांनी विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जे बंड झालं त्यामध्ये अजित पवारांसोबत भुजबळ आघाडीवर होते. मात्र आता तेच भुजबळ म्हणत आहेत कि ज्याप्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फूट पडली ते पाहता लोकांमध्ये सहानुभूतीची लाट आहे पण तरीही लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे. देशात मजबूत सरकार असावं अशी लोकांची इच्छा आहे,’ असं भुजबळ म्हणाले.
बारामती मध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात थेट सामना यंदा पाहायला मिळाला आहे, त्याबाबत छगन भुजबळ यांना विचारलं असता ते भावुक झाले, माझ्यासाठीही हे दुःख आहे की, जे लोक एकाच घरात इतकी वर्षे एकत्र राहत होते. जे काही घडत आहे ते अनेकांना आवडत नाही. यात दोष कोणाचा? ही वेगळी बाब आहे, पण हे घडले नसते तर खूप छान झाले असते अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप महायुतीकडून सुटलेला नाही. छगन भुजबळांनी आधीच नाशिक लोकसभेतुन माघार घेतली आहे. याबाबत विचारलं असता भुजबळ म्हणाले, नाशिकसाठी मी तिकीट मागितलं नव्हतं, मात्र होळीच्या वेळी राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी नाशिकमधून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. दिल्लीतील मित्रपक्षांच्या रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर भुजबळांना हे सांगण्यात आले. दुसरीकडे शिंदे गटालाही एक जागा हवी होती. छगन भुजबळ आणि त्यांचे सुपुत्र येथून आमदार असल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यास सहमती दर्शवली होती. तसेच त्यांनी केलेल्या विकासकामांमुळेच त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे भुजबळ म्हणाले . मात्र तीन आठवडे होऊनही नाशिकबाबत उमेदवारी जाहीर न झाल्याने भुजबळांना आश्चर्य वाटले.