नुकसानीचे पंचनामे बांधावर जाऊन व्हावे; आमदार दानवेंची मुख्यमंत्रांकडे मागणी

औरंगाबाद – जिल्ह्यासह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. अशातच अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची माहिती स्थानिक पातळीवर कार्यरत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा यंत्रणेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले जावेत, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

याबाबत आमदार दानवे यांनी म्हटले आहे की, इ पीक पाहणी ॲपमध्ये पिकांची, नुकसानीची माहिती भरताना अनेक अडचणी येत आहेत. इन्शुरन्स कंपन्यांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगण्यात आल्याने 10 टक्के सुद्धा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. यासाठी याकरिता स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा यंत्रणा राबवून ज्या शेतकऱ्यांचे खरेच नुकसान झालेले आहे, त्यांचे जिओ टॅगिंग करून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना निर्देशित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

निवेदनात केलेल्या प्रमुख मागण्या –
– बाधित शेतकऱ्यांना 2 हेक्‍टरपर्यंत अनुदान देण्यात यावे.
– घर पडलेल्यांना घरे बांधून देणे आवश्यक आहे.
– सिंचन विहिरीची हमी योजनेतून बांधकाम दुरुस्ती करावी.
– विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा.
– रस्ते पूल वाहून गेले आहेत त्यांची दुरुस्ती करावी.