हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानले जाणारे पुणे (Pune) शहर हे विद्येचे माहेरघर असून शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्ट्या एक महत्वाचे केंद्र बनले आहे. पुण्यात फक्त महाराष्ट्राच्याच कानाकोपऱ्यातून नव्हे तर संपूर्ण देशातून शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी लोक येत असतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी विमानसेवा हा महत्वाचा घटक बनतो. याच पार्श्वभूमीवर पुणे एअरपोर्टचा विकास केला जात असून आता पुणे विमानतळावरून भारतातील अजून 3 शहरांना थेट उड्डाणाची सोय करण्यात आली आहे. राजकोट वडोदरा आणि जोधपूर अशा या 3 शहरांची नावे आहेत.
पुणे लोहगाव एअरपोर्टवर रणवे लाइटिंगच काम सुरू असून आता 24 तास विमान वाहतूक शक्य झाली आहे. त्यामुळे आता काही शहरे पुण्याशी जोडण्याचे काम सुरू आहे. मागील महिन्यामध्ये पुणे शहरातून उड्डाणे वाढवण्यात आली होती. त्याचबरोबर आता पुणे विमानतळावरून राजकोट, वडोदरा, आणि जोधपुर साठी ७ जुलै पासून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे आता कमीत कमी वेळेत राजकोट आणि वडोदरासह जोधपूरला पोहोचता येणार आहे. यापूर्वी जून महिन्यात गो फर्स्ट ने नवी दिल्ली, बेंगलोर, नागपूर यांसारख्या ७ शहरांत सात उड्डाणे सुरू करण्यात आली होती.
आता इंडिगो कंपनीने ही सेवा सुरू केली असून राजकोट वडोदरा आणि जोधपूर या शहरांमध्ये पुण्याहून थेट विमानाची सोय करण्यात आली आहे. या माध्यमातून कंपनीने महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थानचा त्रिकोण पूर्ण केला आहे. कंपनी चे अधिकारी विनय मनोत्रा यांनी सांगितले की पुणे राजकोट एअरलाईन्स आठवड्यातून एक दिवस तर पुणे – वडोदरा आणि पुणे- जोधपूर विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस सुरु राहील. सध्या पुणे शहरातून सुमारे एकूण 90 ते 92 उड्डाणे आहेत. त्याचबरोबर पुणे शहरात येणारे आणि पुणे शहरातून बाहेर उड्डाण करणाऱ्या विमानांची एकूण संख्या 178 ते 184 एवढी आहे. सणासुदीच्या काळात ही संख्या 200 पेक्षा जास्त असते.




