हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. इतकंच नाही तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला आहे.
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. यावेळी ‘पुणे पोलीस मुर्दाबाद’ अशा घोषणादेखील देण्यात आल्या. सध्या आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
पोलीस अचानक आले आणि आम्हाला घर खाली करण्यास सांगत आहेत. आम्हाला या कारवाईसंबंधी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. आमचं घर गेल्यावर कुठे जायचं असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. आम्ही येथे ५० ते ६० वर्षांपासून राहत असून आम्हाला पर्यायी व्यवस्था द्यावी त्यानंतर कारवाई करा अशी नागरिकांची मागणी आहे. तसंच पालिका नाही तर खासगी बिल्डरच्या नोटीशीनंतर कारवाई सुरु असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
काय आहे प्रकरण –
कात्रज तलावापासून आंबिल ओढ्याला सुरुवात होते. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. जागा बळकवण्यात लोकप्रतिनिधींचाही हात असल्याचाही आरोप केला जात आहे.