औरंगाबाद | यमदूत बनलेल्या बीड बायपासचे सध्या काँक्रिटीकरण सुरु आहे. अवजड वाहनामुळे वाहतूक कोंडी होत आहे. आणि मागील बारा महिन्यांमध्ये बीड बायपासने 16 जणांचा बळी घेतला आहे. सध्या बीड बायपासवर काँक्रिटीकरण आणि 2 उड्डाणपुलाचे काम सुरू आहेत. त्यामुळे बीड बायपास वाहतुकीसाठी अवजड ठरला आहे. हा रस्ता अगोदरच अरुंद असून रस्त्यावर उड्डाणपुलासाठी तीन पत्रे लावून रस्ता बंद करण्यात आलेला आहे. आणि पत्रा शेजारी तात्पुरती एक नवीन लेन तयार करण्यात आलेली आहे. यामुळे सकाळी 11 वाजेच्या सुमारास आणि रात्री 9 वाजता अवजड वाहने जाण्यास सुरुवात होते त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
जर आतापर्यंत नवीन बीड बायपासचे काम वेगाने पूर्ण झाले असते, तर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली नसती. सध्या नवीन बीड बायपासचे 90% डांबरीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाने समन्वय साधून नव्या बायपास वरून अवजड वाहतूक वळवल्यास जुन्या बायपासवरील वाहतूक कोंडी कमी होईल.
नवीन बीड बायपासचे काम पूर्ण होऊ उद्घाटन व्हायला अजून तीन महिने बाकी आहेत दुर्दैवाने जर कोरोनाची तिसरी लाट लवकर आली तर काम पूर्ण व्हायला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळे जर आत्ताच नवीन बीड बायपास वरून वाहतूक वळवली नाही किंवा पालिकेने जुना सर्विस रोड मुक्त केला नाही तर कमीत कमी तीन महिने तरी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.