हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनांचे काही कारणांमुळे छोटे – मोठे अपघात होतात. अशावेळी वाहनांचे नुकसान होते. मात्र, आतील प्रवाशांचे जीव वाचतात. अशीच घटना पुणे – बंगळूर महामार्गावर कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत घडली आहे. या ठिकाणी आज सकाळी सुसाट वेगाने जाणाऱ्या एका एसटी बसचा अचानक पुढील टायर फुटला. मात्र, बसमधील चालकाने प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत मसूर फाटा येथील एका पुलावरून मेढा- सातारा ते नरसिंहवाडी अशा मार्गे जाणारी एसटी बस (MH 07 C 7143) प्रवाशांसोबत घेऊन निघाली होती. साधारणतः एसटीमध्ये 65 ते 70 प्रवासी प्रवास करत होते. पुलावरून बस निघाली असताना उतारावर अचानक या बसचा पुढील कंडक्टर बसतो त्या बाजूचा टायर फुटला. अचानक टायर फुटल्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला निघाली.
बसमधील प्रवासीही घाबरून गेले. पुढे कोणती दुर्घटना घडणार तेवढ्यात चालकाने प्रसंगावधान राखून बस नियंत्रितपणे रस्त्याकडेला आणून उभी केली. आणि बसमधील असलेल्या सुमारे 70 प्रवाशानी सुटकेचा निःश्वास सोडला.