Satara News : कराडच्या मलकापूरातील उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील उड्डाण पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या ठिकाणी वारंवार पुलाच्या कामामुळे वाहतूक वळविली तसेच बंद ठेवली जात असल्याने याचा नाहक त्रास वाहतूकदारांना सहन करावा लागत आहे. शनिवारी महामार्गावरील कराडनजीक मलकापूर येथील उड्डाण पूलावरील वाहतूक अचानकपणे बंद करण्यात आली. त्यामुळे महामार्गावर सुमारे 3 किलो मीटर अंतरापर्यंत अवजड तसेच लहान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलया.

एकीकडे पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. तर दुसरीकडे कऱ्हाडातील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी मोठा उड्डाणपूल उभारण्याचे काम केले जात आहे. महामार्गावरील वाहतूकही वळविण्यात आली आहे. दरम्यान कराड नजीक असलेल्या मकलापूर हद्दीतील पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल शनिवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उड्डाणपूल बंद करण्यात आल्याने उपमार्गासह महामार्गावर सुमारे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. याचा महामार्गावरून जाणाऱ्या वाहतूकदारांना व स्थानिकांना चांगलाच फटका बसला.

मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल पाडण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीकडून अनेक प्रयोग केले जात आहेत. मात्र, त्या अगोदरच वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शॉर्टकट जाण्याऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. कोल्हापूर नाका येथील उड्डाण पूल पाडण्याच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा हा नेहमीचाच विषय बनला होता. महामार्ग सहापदरीकरण करणाऱ्या कंत्राटदाराने मलकापूरातील उड्डाणपूल पाडण्यासाठी अनेकवेळा वाहतूकीत बदल केले आहेत.

 

सुमारे 3 तास वाहतूक कोंडी

वाहतूकीतील बदलानुसार शनिवारी शिवछावा चौकातील उड्डाणपूल वाहतूकीस बंद केला. पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने सर्व वाहतूक दोन्ही उपमार्गावरून वळवण्यात आली. बघता-बघता काही वेळातच वाहतूकीची कोंडी होऊन उपमार्गांसह महामार्गावर तीन किलोमीटर पर्यत रांगा लागल्या. 3 तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबली असल्याने प्रवासी आणि वाहन चालक चांगलेच वैतागले.

शाळेच्या मुलांना वाहतूक कोंडीचा होणार त्रास

मलकापूर येथील उड्डाण पूल शनिवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. शनिवार आणि रविवार शाळांना सुट्टी असल्यामुळे या दोन दिवसात या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. कारण सुटल्यामुळे अनेकजण साताऱ्याहून कोल्हापूरला फिरण्यासाठी जातात तर कोल्हापूरहून सातारा, पुणेला लोक येतात. त्यामुळे दोन दिवस चांगलीच वाहतूक कोंडी निर्माण होणार आहे. शिवाय रोज विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी वाहने मलकापूरच्या उड्डाणपुलावरून ये-जा करत असल्याने तीही आता वाहतूक कोंडीत अडकणार आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना अडचनी निर्माण होणार आहेत.