पुणे । राज्यातील विविध भागातून आता हळूहळू लोक परतत आहेत. पुण्यातही गेल्या काही दिवसात परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यांमधून लोक आले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाकडून विविध उपाय राबविले जात आहेत. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सद्यस्थिती लक्षात घेऊन बाहेरून पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आलेल्या प्रत्येक नागरिकाला घरातच विलगीकरणात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. १४ दिवस या नागरिकांना सक्तीने विलगीकरणात ठेवावे असे आदेश त्यांनी दिले आहेत.
नवलकिशोर राम यांनी ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि नगरपालिका यांना या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी समित्या स्थापन करण्यास सांगितले आहे. ग्रामपंचायत स्तरावरील समितीचे अध्यक्ष हे सरपंच तर नगरपालिका, नागरपरिषद स्तरावरील अध्यक्ष हे नगराध्यक्ष असतील असे त्यांनी सांगितले. परराज्य आणि परजिल्ह्यातून पुण्यात येणाऱ्या लोकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही झोनमधून येणाऱ्या व्यक्तीस विलगीकरणात ठेवा असा सक्त आदेश त्यांनी जारी केला आहे.
दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत साधारण २१ हजाराहून अधिक नागरिक परतल्याची आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. यामध्ये परराज्यातून आलेल्या ५४८९ आणि परजिल्ह्यातून आलेल्या १६४०४ नागरिकांचा समावेश आहे. २४५६ विद्यार्थी, ३८४ यात्रेकरू/पर्यटक, १८४९ कामगार तसेच १७२०४ इतर व्यक्ती यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला असून याची कडक अंमलबजावनी करण्याचे आदेश ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद यांना देण्यात आले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.