कौतुकास्पद! मस्जिदीची जागा दिली कोरोना संशयित रुग्णांच्या अलगाव साठी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढते आहे. पुणे, मुंबई या शहरांमध्ये अधिकाधिक रुग्ण सापडत आहेत. प्रशासन आपल्यापरीने संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या धर्तीवर भारतभर असंतोष वाढला होता. एक विशिष्ट जमात जाणीवपूर्वक हा आजार पसरवण्यासाठी कार्यरत असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. पण पुणे शहरात या सगळ्याच्या विरुद्ध झाले आहे. मस्जिदीची जागा अलगाव साठी देऊन मुस्लिम बांधवानी एकतेचे उदाहरण घालून दिले आहे.

पुणे शहरातील आझम कॅम्पस मधील मस्जिदीतील वरच्या मजल्यावरील ९ हजार चौरस फूट अलगाव साठी देण्यात आली आहे. तसेच सर्व सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. सध्या पुणे शहरातील ६० संशयित रुग्णांना या ठिकाणी अलगाव साठी ठेवण्यात आले आहे. या मस्जिदीच्या व्यवस्थापनाने ही जागा देण्याचा प्रस्ताव आपणहून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता. शहरातील रुग्णांची वाढती संख्या पाहता हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्वीकारण्यात आला. आझम कॅम्पस च्या पूर्व भागात ही  मस्जिद असून तिच्या वरच्या मजल्यावर एक मोठी सभागृहासारखी जागा आहे. ही जागा स्वच्छ करून प्रशासनाला देण्यात आली आहे.

तसेच इथे अलगाव साठी असणाऱ्या सर्व रुग्ण आणि बंदोबस्तातील पोलीस कर्मचारी यांच्या नाश्ता जेवणाची सोयही येथील व्यवस्थापनाने केली आहे. सामाजिक समता आणि एकतेचा संदेश देत. या मस्जिदीच्या व्यवस्थानाने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. विनाकारण वाढणारा हिंदू-मुस्लिम द्वेष बाजूला सारून बांधिलकीचा हात बळकट केला आहे.