पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाबाबत एका महिलेनं सोशल मीडियावर लिहलेल्या पोस्टवर अश्लील कॉमेंट केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात हा प्रकार घडला. एका महिलेने तिघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या प्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रुद्रा मराठे, अमोल बाग आणि सारंग चपळगावकर यांच्याविरुद्ध आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान यांचा मन की बात हा कार्यक्रम झाला होता. यामध्ये त्यांनी देशी श्वान पाळण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्याबद्दल मोठी चर्चा झाली. तक्रारदार महिलेनेही फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यावर आरोपींनी अश्लील प्रतिक्रिया दिल्या होत्या. या प्रकरणी महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तिघांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके हे अधिक तपास करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.