Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी राष्ट्रवादी आमदाराच्या पत्नीचा मोठा खुलासा; म्हणाल्या, त्या मुलामुळे माझ्या मुलाला …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघात (Pune Porsche Accident ) प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने २ मुलांना उडवले असून पोलीस याप्रकरणी ऍक्शन मोड मध्ये आलेत. आत्तापर्यंत सदर प्रकरणामध्ये या अल्पवयीन मुलाने ज्या ठिकाणी मद्यपान केलं त्या बार आणि पबच्या मालकांनाही ताब्यात घेतलं आहे तसेच विशाल अग्रवालला सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आता याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पत्नीने सदर अल्पवयीन मुलाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी याबाबत ट्विट केलं आहे. सोनाली तनपुरे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल, कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या… संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती . मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे.

वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी सोनाली तनपुरे यांनी केली आहे. सोनाली तनपुरे यांनी आपल्या ट्विट मध्ये कोणाचे नाव घेतले नाही मात्र त्यांचा रोख हा विशाल अग्रवाल यांच्या कडे दिसत आहे.

विशाल अग्रवालला अटक – (Pune Porsche Accident )

ड्रमायन, पुण्यात अलिशान पोर्शे कारखाली दोन जणांना चिरडणाऱ्या (Pune Porsche Accident ) अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवालला अखेर अटक करण्यात आली. कोणाला आपला थांगपत्ता लागू नये म्हणून म्हणून विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथील एका पडक्या हॉटेलमध्ये लपला होता. मात्र पोलिसाना त्याचा सुगावा लागताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात. कोणत्याही परिस्थितीत अग्रवाल सुटता कामा नये, असे आदेश पुणे पोलिस आयुक्तांकडून छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना देण्यात आले होते.