हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसर (Pune Railway Station) हा नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या आवारातील अधिकृत वाहनतळ वगळता दोनशे मीटरच्या परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रेल्वे स्थानकाच्या आवारातील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांची ने-आण करणाऱ्या मोटारी, रिक्षांना मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यांना जास्त काळ थांबता येणार नाही.
पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway Station) आवारातील दोन्ही प्रवेशद्वारांवर बेशिस्तपणे वाहने लावल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत होती. प्रवेशद्वाराच्या परिसरात वाहने लावल्याने वाहतुकीची कोंडी होत होती… हि वाहतूक कोंडी कुठेतरी कमी केली पाहिजे या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्याशी उपाययोजनांबाबत चर्चा केली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या परिसरातील दोन्ही प्रवेशद्वारांपासून २०० मीटर अंतरावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी नागरिक, तसेच प्रवाशांनी लेखी सूचना, हरकती वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयात १७ मेपर्यंत पाठवाव्यात. सर्व सूचना विचारात घेऊन अंतिम आदेश काढला जाणार आहे.
रेल्वे विभागाकडून नो पार्किंग झोनबद्दल जनजागृती करण्यात येणार – Pune Railway Station-
यानंतर रेल्वे विभागाकडून फलक लावून या नो पार्किंग झोनबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. जनजागृतीनंतर जर कोण कायद्याचा नियम मोडून पार्किंग करत असेल तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नो पार्किंग झोनमध्ये टॅक्सी, रिक्षा, पीक अँड ड्रॉपची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, प्रवेशद्वाराच्या परिसरात जास्त वेळ थांबता येणार नाही. त्याचबरोबर फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांना या नियमातून वगळण्यात आलं आहे.या निर्णयामुळे एकीकडे वाहतूक कोंडीतून सुटका होणार असली तरी नो पार्किंग झोनचा नियम न पाळल्यास प्रवाशांना आर्थिक दंड सुद्धा बसू शकतो.