हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या विकासासाठी राज्यातील महत्वाच्या शहरांमधील दळणवळणाच्या सुविधा सुधारण्याची गरज लक्षात घेऊन राज्यकर्ते त्यासंदर्भात निर्णय घेताना दिसून येत असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस व समृद्धी महामार्गाच्या यश्यानंतर आता पुणे ते नाशिक दृतगती महामार्गाची (Pune To Nashik Highway) तयारी जोरदार सुरु आहे. नाशिक शहरातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नाशिक आणि पुणे या शहरांमधील औद्योगिक वाहतूक देखील मोठी आहे. परंतु सध्यस्थितीत नाशिकहुन पुण्याला जाण्यासाठी 5-6 तासांचा कालावधी लागतो. हा कालावधी पुणे – नाशिक दरम्यान प्रास्तावित दृतगती महामार्गमुळे अर्ध्यावर येणार आहे.
नाशिक – पुणे अंतर 50 km ने कमी होणार :
पुणे आणि नाशिक मार्गांवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी हा महामार्ग बांधण्यात येणार आहे. आधीचा महामार्ग हा 220 km चा असून नवीन होणाऱ्या दृतगती महामार्गामुळे नाशिक – पुणे हे अंतर 50 km ने कमी होणार आहे. तसेच प्रवासाचा कालावधी अर्ध्यावर येणार आहे. या द्रुतगती महामार्गाची सुरुवात पिंपरी-चिंचवडच्या तळवडे आणि चिखली लगतच्या म्हाळुंगे येथून सुरू होणार असून तळवडे- म्हाळुंगे- आंबेठाण- कोरेगाव- किवळे- कडूस- चास- घोडेगाव- जुन्नर- अकोले- संगमनेर- सिन्नर- नाशिक अश्या मार्गाने हा महामार्ग बांधण्यात येणार आहे. नाशिक फाटा ते चाकण पर्यंत मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार असून हा महामार्ग सहपदरी बनवण्यात येणार आहे. तसेच पुणे-नाशिक हायस्पिड लोहमार्गही प्रस्तावित आहे.
औद्योगिक विकासाला मिळणार चालना :
पुणे- नाशिक दृतगती महामार्गाची एकूण लांबी 180 km इतकी असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) उभारणी करण्यात येत आहे. हा महामार्ग पुणे, नाशिक, अहमदनगर या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. त्यातून या भागातील औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळेल. ऑटोमोबइल इंडस्ट्री, आयटी इंडस्ट्री आणि कृषी उद्योगवाढीस मिळणार चालना मिळणार असून सुरत ते चेन्नई महामार्गास जोडणीमुळे पुणे सुरतचा प्रवासही वेगवान होणार आहे. हा महामार्ग पुणे रिंगरोडला जोडला जाणार असल्यामुळे पुण्यातील वाहतूक नियंत्रित होण्यास मदत मिळणार आहे.