हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड, चिपळूण, पालघर, पुणे अशा सर्व ठिकाणी प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे पुणे येथून भोर मार्गे महाडला जाणारा वरंधा घाट रस्ता बंद करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
येत्या २२ जुलै ते ३० सप्टेंबर पर्यंत हा घाट बंद राहणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. तोपर्यंत नागरिक महाडला जाण्यासाठी ताम्हिनी घाटातून प्रवास करू शकतात. पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच वृक्ष पडणे, रस्ता खाचने, माती वाहून जाणे, रस्त्यावर पाणी साचणे असे प्रकार दिसून येत आहे. अशा स्थितीत घाटाच्या मार्गे जाणे धोकादायक असल्यामुळे वरंधा घाट बंद करण्यात आला आहे.
परंतु वाहतुकीसाठी दुसरा मार्ग म्हणून ताम्हिनी घाट रस्ता सुरुच आहे. वरंधा घाटावरून महाडला जाण्याचे अंतर खूप कमी आहे. त्यामुळे अनेकजण वरंधा घाटाचा पर्याय निवडतात. या घाटात नागमोडी वळणे, अरुंद रस्ता आहे. याठिकाणी पावसाच्या वातावरणात अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच दरड कोसळण्याची देखील भीती आहे. यासाठीच वरंधा घाटाचा रस्ता बंद करण्यात आला आहे. अति आवश्यकता असेल तर नागरिक ताम्हिणी घाटातून प्रवास करू शकतात.
पुण्यातून भोर मार्गे जाणारे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. रस्त्यांमध्ये खड्डे, कच्चा रस्ता अशा अनेक कारणांवरून हा मार्ग धोक्याचा ठरत आहे. या ठिकाणी अनेक अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र अद्याप प्रशासनाकडून रस्त्याचे काम करण्यात आले नाही. आता भोरमार्गे महाडला जाणाऱ्या रस्त्यांची स्थिती पाहून येत्या २२ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वरंधा घाट रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.