हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Purnagad Fort) आपल्या महाराष्ट्र्राला भव्य असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इतिहास म्हटलं की, सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि त्यांचे गड किल्ले समोर येतात. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवरायांना अनेक गड किल्ल्यांचे योगदान लाभले. ज्यातील काही किल्ले त्यांनी लढाई करून जिंकले होते. तर काही किल्ले त्यांनी बांधले होते. यांपैकी काही किल्ले महाराष्ट्रातील कोकण भागात आहेत. कोकणाला दूरवर पसरलेली समुद्र किनारपट्टी लाभली आहे. जिथे गर्द झाडीत एक जलदुर्ग दडला आहे. त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
कोकणातला छुपा किल्ला
महाराष्ट्राची कोकण किनारपट्टीदेखील इतिहासाची साक्ष देते. कारण कोकणात असलेल्या गडकिल्ल्यांपैकी काही कोकण किनारपट्टीलगत आहेत. ज्यांना जलदुर्ग असे म्हटले जाते. यांपैकी एक म्हणजे पूर्णगड. कोकणातील गर्द झाडीत दडलेला हा किल्ला सहसा दिसून येत नाही. म्हणून या किल्ल्याला छुपा किल्ला असे म्हटले जाते.
कुठे आहे पूर्णगड? (Purnagad Fort)
रत्नागिरी जिल्ह्यात पावसजवळ समुद्र किनारपट्टीलगत हा किल्ला आहे. हा किल्ला पूर्णगड गावाजवळ आहे. या गावाच्या नावावरूनच हा किल्ला पूर्णगड म्हणून ओळखला जातो, असे काही जण सांगतात. पूर्णगड गावातून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर हा किल्ला स्थित आहे. पूर्णगड हा कोकणातील गर्द झाडीत दडलेला एक छुपा जलदुर्ग असून पूर्णगड गावात प्रवेश केल्यावर हा किल्ला लगेच दिसून येत नाही. मात्र, समुद्रातून या किल्ल्याची तटबंदी दिसून येते. किल्ल्याच्या दक्षिण बाजूला मुचकुंदी नदीची खाडी आणि पश्चिमेकडे सागरी किनारा आहे.
छुप्या पूर्णगड किल्ल्याचा इतिहास
मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इ.सं. १७२४ मधे पूर्णगड किल्ला बांधल्याचे काही इतिहास तज्ञ मंडळी सांगतात. (Purnagad Fort) या किल्ल्याविषयी इथले स्थायिक सांगतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम इथे थांबवले. म्हणून या किल्ल्याला ‘पूर्णगड’ असे नाव देण्यात आले. पूर्वी रत्नागिरीत खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात सागरी व्यापार व्हायचा. इथून मुंबई आणि कालिकत बंदरांसोबत व्यापार होत असे. ज्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुचकुंदी नदीच्या उत्तर काठावर असलेल्या टेकडीवर हा किल्ला बांधला गेला. यानुसार हा किल्ला टेहळणीसाठी बांधण्यात आला असल्याची माहिती देतात.
चोर दरवाजा
पूर्णगड किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे समुद्राकडे जाणारा चोर दरवाजा. पुर्णगड गावात प्रवेश केल्यावर १० मिनिटात किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. ज्यांच्यासमोर हनुमानाचे मंदिर आहे. (Purnagad Fort) हे मंदिर दोन बुरुजांच्या मध्ये लपवलेले आहे. तर आतल्या बाजूस २ देवड्या आहे. किल्यात प्रवेश करताच समोर एक मोठा चौथरा आहे. ज्याच्या मागे किल्ल्यावरुन थेट समुद्राच्या दिशेने बाहेर पडणारा चोर दरवाजा आहे. हा किल्ला फिरायला साधारण १५ मिनिटे पुरेशी आहेत.
कसे जायचे?
पूर्णगड किल्ल्याला भेट द्यायची असेल तर रत्नागिरी शहरातून २५ किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागतो. यासाठी रत्नागिरी बस डेपोतून पूर्णगड गावात जाण्यासाठीची एसटी पकडावी. याशिवाय खाजगी वाहनाने देखील पूर्णगड गावी जाता येईल. गावात पोहचल्यावर पायऱ्यांच्या वाटेने किल्ल्यावर जाण्यासाठी केवळ १० मिनिटे लागतात. (Purnagad Fort)