R Ashwin । भारत विरुद्व इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोट येथे सुरु असून आजचा सामन्याचा तिसरा दिवस आहे. मात्र तत्पूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन अचानक तडकाफडकी तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.अश्विनच्या कुटुंबात अचानक काही प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे त्याला सामन्यात मधूनच बाहेर पडावे लागत आहे. बीसीसीआयने आपल्या एक्स अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली.
राजीव शुक्ल यांनी केलेल्या ट्विटनुसार, अश्विनच्या (R Ashwin) आईची तब्येत खराब आहे, त्यामुळेच तो घाईघाईने टीम इंडियाला सोडून चेन्नईतील आपल्या घरी परतला. या कठीण काळात बीसीसीआय ठामपणे अश्विनच्या पाठीशी उभी असून बोर्ड अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करेल.’ ‘ आम्ही अश्विन आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि कठीण काळात त्यांच्यासोबत आहोत, ‘ असे बीसीसीआयने म्हटले आहे.
अश्विनने कालच घेतले होते 500 बळी – R Ashwin
दरम्यान, कालच अश्विनने इंग्लंडच्या झॅक क्रोवलेची विकेट घेत कसोटी क्रिकेट यामध्ये ५०० बळी घेण्याचा टप्पा पूर्ण केला होता. माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीमध्ये ५०० बळी घेणारा अश्विन भारताचा दुसराच गोलंदाज आहे. मात्र अश्विनने 98 व्या कसोटी सामन्यात ही ५०० बळी घेण्याची कामगिरी केली आहे. अनिल कुंबळेने 105 कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण करणारा अश्विन (R Ashwin) हा जगातील नववा आणि फिरकीपटूंच्या बाबतीत पाचवा गोलंदाज ठरला आहे. काल त्याने ५०० बळी घेताच याचे संपूर्ण श्रेय त्याच्या वडिलांना दिले होते. अश्विन म्हणाला कि, त्याचे वडील नेहमीच त्याच्या पाठीशी उभे राहिले.’