Sunday, May 28, 2023

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘राडा’

औरंगाबाद – कन्नड तालुक्यातील औराळा इथं माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजना जाधव यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते काल आमने सामने आले. त्यानंतर काही वेळासाठी औराळ्यातील वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते. येथील आठवडी बाजारात देखील या धक्काबुक्कीचे पडसाद दिसून आले.

औराळा इथं हर्षवर्धन जाधव यांची सभा सुरु होती. सभा संपताच हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. नंतर या वादाला धक्काबुक्कीचे स्वरुप आले. गावातील काही तरुणांच्या मध्यस्थीने अखेर काही काळाने हे वातावरण शांत झाले. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावासाहेब दानवे यांच्या त्या कन्या आहेत. मागील वर्षीच हर्षवर्धन जाधव यांनी संजना जाधव यांना आता माझे नाव लावू नका, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर संजना जाधव यादेखील राजकारणात सक्रीय झाल्या असून कन्नड-सोयगाव मतदारसंघात त्या अॅक्टिव्ह आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कन्नड तालुक्यातील विविध गावांमध्ये फिरत आहेत. सभा घेत आहेत. यासाठीच गुरुवारी औराळा इथं हर्षवर्धन जाधव यांची दुपारी बारा वाजेच्या सुमारास सभा सुरु होती. या सभेत हर्षवर्धन जाधव यांनी कुणाचेही नाव न घेता सर्व पक्षीय नेत्यांसह संजना समर्थकांवर टीका केली.

दरम्यान, संजना जाधव यांचे समर्थक तथा शेरोडीचे सरपंच जयेश बोरसे, आडगावचे सरपंच ज्ञानेश्वर बोरसे, आडगावचे सरपंच ज्ञानेश्वर निकम हे सभेदरम्यान स्टेजवर जाऊन बसले. सभा संपताच त्यांनी हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. नंतर या वादाला धक्काबुक्कीचे स्वरुप आले. गावातील काही तरुणांच्या मध्यस्थीने अखेर काही काळाने हे वातावरण शांत झाले.