हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व खरीप हंगामाची परिस्थिती यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु आहे. या बैठीकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करीत एका मराठा तरुणाने चांगलाच राडा घेतला. या तरुणाने जोरदार घोषणाबाजी केली आहे. तरुणाकडून घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्याला नेण्यात आले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारकडून सोडवला जात नसल्याने मराठा समाजातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असलेला पहायला मिळत आहे. या समाजातील तरुणांकडून राज्यकर्त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात येत आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांच्या बैठकी दरम्यान कार्यालयाबाहेर एका मराठा समाजाच्या तरुणाने “छत्रपती शिवाजी महाराजकी जय, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,” अशा घोषणा दिल्या. तरुणाच्या घोषणाबाजीमुळे कार्यालयातील बैठकीत उपस्थित असणाऱ्या अधिकारी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष गेले.
मराठा समाजातील युवकांमधून सरकारकडून लवकरात लवकर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात याव, अशी मागणी केली जात आहे. कोल्हापुरात झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलनाशी तरुणांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दर्शवण्यास आला होता. या ठिकाणीही उपमुख्यमंत्री अजित पवार याना समाजातील युवकांकडून काळे झेंडे दाखविण्यात आले होते.